मराठीला अभिजातचा दर्जा मिळण्यासाठी दिल्ली स्वारी करणारी शाखा
सातारा शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आहे परंतु 1992-93 साली झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानंतर साहित्य क्षेत्रात भरीव काम झाले नव्हते. साता-यातील नामवंत साहित्यिक, विचारवंत यांना अखिल भारतीय स्तरावर स्थान मिळत नव्हते त्यामुळे पत्रकार, सहकार क्षेत्रातील विनोद कुलकर्णी यांनी मसाप, शाहुपुरी शाखेची स्थापना सात वर्षापूर्वी केली. अल्पावधीत विविध उपक्रम, व्याख्याने, चर्चासत्र, संमेलने घेऊन साहित्य क्षेत्राला उर्जितावस्था प्राप्त करुन तर दिलीच परंतु मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आंदोलन उभे केले. थेट दिल्लीपर्यंत धडक मारत मराठीला अभिजातचा दर्जा मिळालाच पाहिजे हे ठणकावून सांगितले. त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध आणि सन्मानाने व्हावी यासाठी पुढाकार घेतला. अशा या वैशिष्टयपूर्ण शाखेविषयी..............
साहित्य क्षेत्राला आलेली मरगळ दूर झाली पाहिजे. विविध उपक्रमांव्दारे मान्यवर साहित्यिक, लेखक, विचारवंत सातारकरांना ऐकायला, बघायला मिळाले पाहिजेत या हेतूने मसाप, शाहुपुरी शाखेची स्थापना झाली. स्थापनेनंतर मराठी भाषा दिन आणि सातारा नगरपालिकेच्या सहकार्याने महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा, लेखक तुमच्या भेटीला, मराठी वाडमय मंडळ असे उपक्रम सुरु केले. या उपक्रमांना सातारकरांचा प्रतिसाद मिळाल्याने नवनवीन उपक्रमांसाठी प्रोत्साहन मिळाले. शाखेच्या विविध कार्यक्रमासाठी कवी मंगेश पाडगांवकर, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. रविंद्र कोल्हे, अनिल अवचट, डॉ. अनिल काकोडकर, अभिनेते अतुल कुलकर्णी, सई परांजपे, प्रवीण दवणे, डॉ. श्रीपाद जोशी, प्रा.रा.र. बोराडे, कवियत्री अरुणा ढेरे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अनेक माजी अध्यक्ष, मंगला गोडबोले, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक यांच्यासह अनेक विविध विषयांवरील मान्यवर लेखक, विचारवंत साता-यात आले. सातारकरांना त्यांचे विचार ऐकता आले. शाखेने एकदिवसीय साहित्य संमेलन ही संकल्पना राबवली. त्याचबरोबर साता-यात दोन विभागीय साहित्य संमेलन, युवा नाटय संमेलन घेतले. किशोर बेडकिहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी वाडमय मंडळ कार्यरत असून त्यात विविध विषय, विविध पुस्तके, लेखनावर चर्चा केली जाते. शाहुपुरी शाखेने साहित्याच्या व्यासपीठावरुन सामाजिक कार्यास मदत देऊन नवीन पायंडा पाडत हा समज खोडून काढला. त्यासाठी प्रसिध्द उद्योजक संतोष यादव आणि दानूशर सातारकरांची मोलाची साथ मिळाली. यातून डॉ. प्रकाश आमटे यांना अडीच लाख रुपये, डॉ. रविंद्र कोल्हे यांना सव्वा लाख रुपये, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुबियांना मदत करण्यात आली. विज्ञानाच्या प्रसारासाठी मराठी विज्ञान परिषदेस 25 हजाराची मदत दिली.
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने समिती नेमली होती. समितीने अहवाल तयार करुन साहित्य अकादमीकडे पाठवला होता. साहित्य अकादमीने शिफारशीसह तो पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला होता परंतु त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शाखेने मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांना जिल्हयातून एक लाख पत्रे पाठवण्याचा उपक्रम सुरु केला. सातत्याने नेत्यांच्या भेटीगाठी, पत्रव्यवहार, पाठपुरावा करुनही याबाबत काहीच न झाल्याने शाखेने पुढाकार घेऊन थेट दिल्लीत जाऊन साहित्यिक आणि लोकप्रतिनिधींना घेऊन प्रार्थना आंदोलन केले. त्यावेळी तत्कालीन मंत्री जावडेकर यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते परंतु तरीही अद्याप प्रश्न सुटलेला नाही. जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याचेही विनोद कुलकर्णी यांनी सांगितले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध आणि सन्मानांने व्हावी यासाठी मसापच्या बैठकीत ठराव घेण्याचा प्रस्ताव शाखेमार्फत देण्यात आला. मसाप, पुणेने तो पुढे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत मंजुर झाला आणि नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवियत्री अरुणा ढेरे यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे एक चांगली परंपरा निर्माण करण्यात सातारकरांच्या पाठिंब्यामुळे मसाप, शाहुपुरी शाखेला यश आले.
शाहुपुरी शाखेला अल्पावधीत मिळालेले यश हे माझ्या एकटयाचे नसून त्यात ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, कार्याध्यक्ष नंदुकमार सावंत, कोषाध्यक्ष राजेश जोशी, कार्यवाह अॅड. चंद्रकांत बेबले, डॉ. उमेश करंबळेकर, सुभाषचंद्र सरदेशमुख, प्रवीण पाटील, संजय माने, अमर बेंद्रे, दिपाली धुमाळ, फातिमा नदाफ यांच्यासह लेखक डॉ. राजेंद्र माने, दिनकर झिंब्रे, साता-यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी यांचे आहे. नगरवाचनालय, सातारा नगरपालिका, प्रसिध्द उद्योजक संतोष यादव तसेच साता-यातील दानशूर व्यक्तींनी वेळोवेळी सहकार्य केल्याचे विनोद कुलकर्णी यांनी सांगितले.