सातारा - प्रतिनिधी

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सरपंच ,सदस्यांची कर्तव्य, जबाबदारी, कामे, अधिकार निश्चित केलेले आहेत. यात सरपंचांचे मासिक सभा, ग्रामसभा, महिला सभा बोलवणे आणि कार्यवाही करणे, हे कर्तव्य असून यापैकी एक जरी सभा बोलवण्यात कसूर केल्यास कलम ३९ नुसार अपात्रतेची कारवाई केली जाते. त्याच प्रमाणे याच अधिनियमात कलम ७ ( ५ अ ) नुसार प्रत्येक ग्रामसभेआधी प्रत्येक वॉर्डातील सदस्यांनी वॉर्डसभा घेणे, बंधनकारक आहे. ती न घेतल्यास कर्तव्यात कसूर समजून कलम ३९ नुसार अपात्रतेची कारवाई त्या वॉर्ड मधील सर्व सदस्यांच्यावर होते. सातारा जिल्ह्यातील एकाही सदस्यांने वॉर्ड सभा घेतली नसल्याचा अहवाल जन माहिती अधिकारातून मागवलेल्या माहितीतून उघड झाली असून त्यांच्यावर अपात्रेची कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. तक्रारीची चौकशी करून दखल न घेतल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा सुशांत मोरे यांनी दिला आहे.

सातारा जिल्हयातील ११ पंचायत समितीकडून माहिती घेतली असताना जिल्हयातील १४९५ ग्रामपंचायतीमध्ये एकही वॉर्डसभा झालेली नाही. याबाबत विस्तार अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांनी कोणताही अहवाल वरिष्ठांकडे दाखल केलेला नाही. त्याहून आश्चर्य म्हणजे वॉर्डसभा झाली नसल्याची अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना सादर केलेला नाही. त्याबाबत एक ही तक्रार दाखल झालेली नाही. याबाबत तक्रार दाखल केली असून दोन महिन्यात कारवाई न केल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे माध्यम प्रतिनिधींशी वार्तालाप करताना सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे सांगितले.

ग्रामविकास साध्य करण्यासाठी घटनेतील ४० व्या कलमात ग्रामपंचायात स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यास सुचविले आहे. महाराष्ट्रात त्रिस्तरीय व्यवस्था निर्माण केली असून यात ग्रामपंचायतीच्या कार्यपध्दतीत एकसूत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम तयार करण्यात आला आहे. त्यात कलम १३५,१३५ ब , १३६ नुसार प्रत्येकाची कर्तव्य, जबाबदारी, कामे, अधिकार हे निश्चित केली असून त्याची अंमलबजावणी करणे, हे त्यांचे कर्तव्य समजले जाते. त्यात कसूर केल्याच या अधिनियमातील तरतुदीनुसार निलंबन आणि अपात्रतेची कारवाई होऊ शकते.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ७ ( ५ अ ) नुसार ग्रामपंचायतीच्या प्रत्येक वॉर्ड मधील सदस्यांनी ग्रामसभेपुर्वी वॉर्डसभा घेणे बंधनकारक केले आहे. या सभेत वॉर्डतील प्रश्न, विकासाबाबत चर्चा, योजनांची माहिती देणे, करवसुली, ग्रामपंचायत कामकाजाची माहिती देणे, यासह आवश्यक विषय घेतले पाहिजेत. ही वॉर्डसभा बोलवणे, ही त्याच वॉर्डातील सदस्यांचे कर्तव्य असून सभेचे अध्यक्ष आणि सचिव हे त्याच वॉर्डातील सदस्यांपैकी असतात. वर्षाला किमान ४ ग्रामसभा बंधनकारक तसेच प्रत्येक वॉर्डात ही ४ सभा होणे, हे ही बंधनकारक आहे. एक जरी ग्रामसभा घेण्यात कसूर केल्यास सरपंच अपात्र ठरतात. त्याच प्रमाणे एक ही वॉर्डसभा घेण्यात कसूर केल्यास त्या वॉर्डाचे सर्व सदस्य अपात्र ठरतात.

सातारा जिल्हयात असलेल्या ११ पंचायत समितीकडून माहिती घेतली असता १४९५ पैकी एकाही गावात वॉर्डसभा झालेली नसल्याचे समोर आले आहे. मात्र एकाही वॉर्डसभा घेतली नसता ना ही एकही तक्रार दाखल झालेली नाही. ग्रामपंचायतीच्या कामकाजाची नियमित तपासणी करण्याची विस्तार अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. वॉर्डसभा झाल्या नसल्याचा एकाही विस्तार अधिकाऱ्याने वरिष्ठांना अहवाल पाठवला नाही, ही धक्कादायक माहिती स्पष्ट झाली आहे.

जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये वॉर्डसभा होत नाहीत, याची मुख्य कार्यकारी अधिकारी तर तालुक्यात गटविकास अधिकाऱ्यांनी कधीच दखल ही घेतलेली नाही. त्यामुळे वॉर्डसभा न घेणाऱ्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ नुसार कारवाई व्हावी, तसेच कायदेशीर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही कर्तव्यात कसूर केली असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी जिल्हाधिकारी , जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. तर याची 30 नोव्हेंबर पर्यंत दखल घेवून कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सांगितले.

कायद्यात सुधारणा करा

कायद्यात दिलेल्या कर्तव्यात कसूर केली तर अपात्रतेची कारवाई केली जाते. वॉर्ड सभेचे महत्त्व अधिक वाढविण्यासाठी सदस्यांना प्रबोधनाची गरज आहे. जर राज्यात वॉर्डसभा घेतल्या जात नसतील तर कायद्यात सुधारणा करावी.सुधारणा करण्याची आवश्यक वाटत नसेल तर वॉर्डसभा न घेतल्यास तत्काळ अपात्रतेची कारवाई केली पाहिजे. कायद्यात सुधारणा करण्याची मागणी सुशांत मोरे यांनी केली आहे.

कलम ७ ( ५ अ) नुसार वॉर्ड सभेची कार्यवाही

१) प्रत्येक ग्रामसभेपुर्वी सर्व सदस्यांनी एकत्र येवून वॉर्डसभा घ्यावी.
२) वॉर्डसभेचे अध्यक्ष आणि सचिव त्याच वॉर्डातील सदस्यांपैकी असतील.
३) वॉर्डसभेच्या प्रोसिडींगची एक प्रत ग्रामपंचायतीला सादर केली पाहिजे.
४) वॉर्डसभेचे प्रोसिडींग ग्रामसभेत वाचन केले पाहिजे.
५) वॉर्डसभा न घेतल्यास कलम ३९ नुसार कारवाई

पद मिरवायला नाही कामे करायला

ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची होते , मात्र निवडून आल्यावर सदस्य जबाबदारी, कर्तव्य पार पाडत नाहीत. फक्त मासिक सभेला जाऊन सहया करतात. वॉर्ड सभा घेतली की त्यांना नागरिक प्रश्न, कामाबद्दल विचारणा करु शकतात. त्यामुळे काम करावे लागेल. त्यामुळे सदस्य पद हे मिरवायला नाही तर कामे करण्यासाठी असल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले.