पाचगणी/ प्रतिनिधी
महाबळेश्वर पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भिलार गणातून कासवंड गावच्या सुशिक्षित उमेदवार पूनम निलेश गोळे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. रखडलेल्या विकासाला चालना देणे, भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि शेतकऱ्यांसह मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे गणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रस्थापित नेत्यांसमोर एक सक्षम आव्हान उभे राहिले आहे.या निवडणुकीत पूनम गोळे बाजी मारणार अशी भावना समर्थकांनी व्यक्त केली आहे.
भिलार गण आणि गट त्याच त्या चेहऱ्यांना कंटाळली असून 'बदल हवा तर चेहरा नवा' हा फॉर्म्युला घेऊन भिलार गणातून पूनम गोळे यांचे नाव पूढे आले आहे.पूनम गोळे हे नाव संघर्षातून पूढे आले आहे.'जिथं जिथं अन्याय अत्याचार तिथ तिथं पूनमताई' अशी ओळख त्यांनी गेल्या काही वर्षात आपल्या कामातून मिळवली आहे.पती निलेश गोळे यांच्या साथीने सौ.गोळे यांनी भिलार गणात झंजावत निर्माण केला आहे.
आपल्या उमेदवारीमागील भूमिका स्पष्ट करताना पूनमताई म्हणाल्या "मी निवडणुकीला सामोरे जाणार नव्हते,परंतु भागाची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी मी निवडणुकीला सामोरे जायचा निर्णय घेतला आहे. "ज्या ठिकाणी काँक्रिटीकरण होते, तिथे स्टील वापरले जाते. मात्र, येथे केवळ सिमेंट पावडर आणि निकृष्ट थराचा वापर करून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम झाले आहे. हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे," असा थेट आरोप त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेवर केला."आपण स्ट्रॉबेरीचे शेतकरी झालो, पण उद्योगपती होऊ शकलो नाही, ही खंत मनात कायम आहे," असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा मुद्दा अधोरेखित केला. "माझा विजय झाल्यास, भिलार गणातील शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीसाठी कंपन्यांचे दरवाजे ठोठावे लागणार नाहीत. उलट, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालय, खादी ग्रामोद्योग, महात्मा फुले महामंडळ आणि कलाकृती इन्व्हरमेंट यांसारख्या विभागांच्या माध्यमातून शेतकरी कसा स्वावलंबी आणि परिपूर्ण होईल, यावर मी भर देणार आहे," असे आश्वासन त्यांनी दिले.प्रशासनातील विविध विभाग आणि अधिकाऱ्यांसोबत कामाचा दांडगा अनुभव आपल्या पाठीशी असल्याचे सांगत, "या अनुभवाच्या जोरावर मीच माझ्या भागाचा विकास सक्षमपणे करू शकते, हा विश्वास मला आहे. माझा विचार सुशिक्षित आणि सक्षम नेतृत्वाला पसंती देणारी युवा पिढी नक्कीच स्वीकारेल आणि मला भरघोस मतांनी विजयी करेल," असा विश्वास पूनम गोळे यांनी व्यक्त केला.
त्यांच्या उमेदवारीमुळे भिलार गणातील निवडणूक अधिकच रंगतदार होणार असून, मतदार विकासाच्या मुद्द्यावर सुशिक्षित नेतृत्वाला संधी देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी, संपर्कासाठी उजव्या हाताकडील व्हॉटसअप बटनवर क्लिक करा

