NEWS & EVENTS

महाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना एसटीकडून खूशखबर

गणेशोत्सव जवळ आला असून मोठ्या प्रमाणात कोकणवासीय आपल्या गावी जात असतात.

53st-bus.jpg

मुंबई, दि. 19- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने यंदाही विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने यंदा दोन हजार २०० जादा बससेवांची घोषणा केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना एसटीकडून २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत पहिल्या टप्प्यातील जादा बस सेवेचा लाभ घेता येणार आहे. २७ जुलैपासून या बसचे आगाऊ आरक्षण करता येणार आहे. विशेष म्हणजे, यंदापासून कोकणात जाणाऱ्यांना परतीच्या प्रवासाचंही आरक्षण एकाच वेळी करता येणार आहे.

राज्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी याबाबत माहिती दिली. येत्या २७ जुलैपासून जादा गाड्यांचं ऑनलाइन आरक्षण करता येणार आहे. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी ‘वाहन दुरुस्ती पथक ‘ (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे भाविक ग्रुपने बस आरक्षित करतात. अशा ग्रुप आरक्षणाला २० जुलैपासून सुरुवात होणार आहे. संबंधित प्रवाशांनी ग्रुप बुकिंगसाठी जवळच्या एसटी आगारात संपर्क साधावा, असं आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.