सातारा, दि. 18- सातारची ओळख सातासमुद्रापलीकडे आहे. येथे चांगले तत्काळ रुजते. सातारा देशातील असे पहिले गाव आहे की तेथे काटेसावर महोत्सव होत आहे. हा उत्सव आपण महाराष्ट्रभर नेऊ. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या झाडांचा उत्सव करू. काटेसावरचे पर्यावरणातील महत्त्व किती मोठे आहे हे आपण आता ओळखले पाहिजे. एक झाड आपल्या सात ते आठ पिढ्यांना पुरणारे आहे. त्यामुळे झाडे लावूनच उत्तर द्यावे लागणार आहे. हवा, फळे, फुले देणाऱ्या झाडांसमोर नतमस्तक होणे काळाची गरज आहे. आपण प्रत्येकांनी डोंगर हिरवागार करण्याचे स्वप्न पाहू. मला माहित आहेत आता निवडणुका आहेत. त्यामुळे पैशांचा महापूर येणार आहे. उमेदवारांकडून जेवढे पैसे दारू आणि मतांसाठी खर्च होणार आहेत तेवढेच पैसे जर पर्यावरण रक्षणासाठी खर्च झाले तर प्रत्येक माणूस सुखी होणार आहे. असे प्रतिपादन प्रख्यात चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी काटेसावर महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले. सयाजी शिंदे यांनी साताऱ्यातील तीसहून अधिक स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सहकार्याने 'एक मूल... एक काटेसावर..!' ही अभिनव संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून रविवार, दि. १७ रोजी सातारा शहरालगत असणाऱ्या यवतेश्वर येथे काटेसावर महोत्सवाचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप त्याचबरोबर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यावरणप्रेणी, वृक्षप्रेमी आले होते.
महोत्सवास सुरुवात होण्यापूर्वी टाळ मृदंगाच्या गजरात वृक्षदिंडी काढण्यात आली. सातारा तसेच आजूबाजूच्या परिसरातील काही शाळांमधील विद्यार्थीही यामध्ये सहभागी होते. त्यांनी काटेसावरची चित्रे रेखाटली होती. त्याचीही पाहणी प्रमुख उपस्थितांनी केली. यानंतर यवतेश्वर येथील एका हॉलमध्ये काटेसावर महोत्सवमागील संकल्पना प्रमुख उपस्थितांनी विषद करत देशी झाडांची पर्यावरण रक्षणात किती मोठी गरज आहे, याची मांडणी करण्यात आली. यावेळी कोल्हापूरातील सुहास वायगंणकर, डॉ. कैलास खडतरे, विजयकुमार निंबाळकर, सागर गायकवाड, रघुनाथ ढोले, डॉ. श्रीकांत शहा, राजेंद्र माने, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. भाग्यश्री शिंदे, अभय फडतरे, ॲड. धीरज घाडगे, सागर कटारिया, यवतेश्वरच्या सरपंच जाधव आदी उपस्थित होते. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या छायाचित्रकार सीमा स्वामी, किशोर ठाकूर, धुमाळ यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सांबरवाडी, यवतेश्वरचे ग्रामस्थ व सरस्वती हायस्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सातारा जिल्हा
हवा, फळे देणाऱ्या झाडांसमोर नतमस्तक व्हा -अभिनेते सयाजी शिंदे


