NEWS & EVENTS

Entertainment

लोकप्रिय होऊनही आलियाला वाटते ‘या’ गोष्टीची भीती

मला स्टार म्हणण्यापेक्षा जर कलाकार म्हटलं तर जास्त आवडेल.

70alia-bhatt.jpg

‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या आलिया भट्टला बॉलिवूडमध्ये सात वर्षांपेक्षा अधिक काळ झाला. या सात वर्षांच्या कालावधीमध्ये तिने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यामुळे एवढ्या कमी वयात सर्वात जलद गतीने स्टारडम प्राप्त करणारी अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. उत्तम अभिनय कौशल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर २० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. यातून तिची लोकप्रियता दिसून येतं. मात्र एवढी लोकप्रियता मिळवूनही आलियाला एका विशिष्ट गोष्टीची भीती असल्याचं तिने सांगितलं.

“मला स्टार म्हणण्यापेक्षा जर कलाकार म्हटलं तर जास्त आवडेल. स्टार आणि स्टारडम हे शब्द आपण सतत ऐकत असतो. मात्र स्टार होणं म्हणजे नक्की काय असतं हे मला माहित नाही. मला स्टार व्हायचं नाही, तर फक्त एक कलाकार व्हायचं आहे. मी कायम स्वत: ला एक कलाकार समजत आले आहे. मला मुळात स्टारडम या संकल्पनेवर विश्वासच नाही. मी एक कलाकार आहे आणि मला तसंच रहायला आवडेल. एक काळ असा होतो जेव्हा मी अपयशाला प्रचंड घाबराचे. पण प्रयत्न केले तर यश आपोआपच मिळतं. आता खरं तर अपयशाला घाबरण्याची गरज नाही. परंतु आता आहे त्या यशात आणखी भर पडावी यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे काही झालं तरी मी प्रयत्न करणं कधीच सोडणार नाही आणि कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करणार नाही”, असं आलिया म्हणाली.

पुढे ती म्हणते, “मी स्वत: मध्ये आणि माझ्या करिअरच्या गर्तते हरवू नये ही एकच भीती मला वाटते. जर असं झालं तर माझ्या आजूबाजूच्या व्यक्तींवर त्याचा जास्त परिणाम होऊ शकतो. अशा अनेक घटना मी पाहिल्या आहेत. कधी कधी आपण स्वत: मध्ये आणि आपल्या कामात एवढं गुंतून जातो की आपलं आजूबाजूच्या घटनांकडे लक्ष राहत नाही आणि याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. त्यामुळे माझं असं होऊ नये ही एकच भीती वाटते”.

सध्या आलिया करण जोहरच्या ‘कलंक’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. करणच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये सहा कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटासाठी माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन आणि आदित्य रॉय कपूर या कलाकारांची वर्णी लागली असून प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेला न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.