NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

“अप्सरा आली’ फेम माधुरी पवारची जल्लोषी मिरवणूक

60madhuri-pawar.jpg

सातारा, दि. 18 – झी युवा वाहिनीवरील अप्सरा आली या रियालटी शोची विजेती साताऱ्याची सुकन्या माधुरी पवार हिची ढोल ताश्‍याच्या जल्लोषात मिरवणुक व सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. डॉ. रविंद्र भारती मित्र समुह व दुर्गेश नंदिनी कला ऍकॅडमी सातारा यांच्यावतीने भव्य मिरवणुक व सत्काराचे आयोजन शाहुकलामंदिर सातारा येथे करण्यात आले होते.
सातारा देवी चौक ते मोतीचौक राजवाडा असे मार्गक्रमण करत शाहुकलामंदिरापर्यंत मिरवणुक काढण्यात आली. करंजे येथील कन्याशाळेच्या विद्यार्थींनी, शिक्षक तसेच दुर्गेश नंदिनी ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. शाळेच्या विद्यार्थींनींनी पारंपारिक पोषाख परिधान केले होते. काहींनी माधुरीचे पोस्टर्स हातात घेतले होते.

आतषबाजी करत ढोल ताश्‍याने संपुर्ण मिरवणूक अत्यंत जल्लोषमय वातावरणात काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान सातारकर नागरिक माधुरीला शुभेच्छा देत होते. तिच्याशी हस्तांदोलन करत होते. अनेक ठिकाणी तिचे स्वागत बुके, गुलाब पुष्प देऊन करत होते. काही युवक युवतींना तिच्यासोबत सेल्फि काढण्याचा देखील मोह आवरत नव्हता. साताराची सुकन्या असलेल्या माधुरी पवारला पाहण्यासाठी राजपथावर रसत्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

माधुरीने मिळविलेल्या यशाबद्दल तिचा शाहुकला मंदिर सातारा येथे सातारा शहरातील नागरिकांच्यावतीने जेष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांच्या हस्ते पेढ्याचा हार घालुन सत्कार करण्यात आला. यासोबतच तिल्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सभापती सातारा नगरपरिषदेचे डॉ. रविंद्र भारती, चित्रपट अभिनेते बाळकृष्ण शिंदे, दुर्गेश नंदी कला ऍकॅडमीचे संचालक ओंकार भंडारे, पंकज चव्हाण, यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाहुकला मंदिर येथे माधुरी पवार तसेच दुर्गेशनंदीनी ऍकॅडमीच्या विद्यार्थ्याचा नृत्याविष्काराची अनोखी पर्वणी यावेळी सातारकरांना पहायला मिळाली.कार्यक्रमात माधुरीचे वडील ज्योतीराम पवार यांनी देखील नृत्य सादर करून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.आई कल्पना वडील ज्योतीराम व सासु स्वाती व पती ओंकार यांनी माधुरीच्या प्रवासाबाबत मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमासाठी सातारकर नागरिकांनी मोठया संख्येने गर्दी केली होती.