सातारा,दि. 16- गेल्या काही दिवसांपासून ढोल्या गणपती मंदिरानजीकच्या रहिवाशांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यामुळे तेथील रहिवाशांनी आज पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात धडकून नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी कैफियत मांडली.
समर्थ मंदिर परिसरातील ढोल्या गणपती मंदिरानजीक कांबळे वस्तीबरोबरच अन्य छोट्या- मोठ्या वस्त्या आहेत. पालिकेद्वारे काही वस्त्यांना सकाळी, तर काहींना सायंकाळी पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये ज्या वस्त्यांना सायंकाळी पाणीपुरवठा होतो, त्यांना सध्या केवळ दहा मिनिटेच पाणी येत असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून रहिवाशांची आहे. काही वेळेला कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, काही वेळेला अनियमित, तर कधी पाणीपुरवठाच होत नाही, असेही रहिवाशांचे म्हणणे आहे. याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात महिला रहिवाशांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांपुढे तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना संबंधित वस्तीमध्ये सायंकाळी जाऊन पाहणी करण्याची सूचना केली, तसेच पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान शहरातील विविध प्रभागांत काही नळांना तोट्या नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नळांना तोट्या नसणाऱ्या नागरिकांना समज देणे आवश्यक बनले आहे.
सातारा जिल्हा
कृत्रिम पाणीटंचाईबद्दल सातारा पालिकेत गाऱ्हाणे


