वाई : पाचगणीत एका नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आज नागा स्वामींकडून वश करून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याने पाचगणी शहरात ऐकच खळबळ उडाली आहे. यामुळे निवडणुकीच्या प्रारंभीच हा प्रकार घडल्याने एन थंडीत वातावरण गरम झाले आहे. या बाबत पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
याबाबत पांचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की संतोष प्रभु कांबळे (वय ४८ ) रा.शिमला हॉटेल, पाचगणी ता. महाबळेश्वर हे शिमला हॉटेल जवळ कुटूंबासह एकत्र राहणेस आहेत. सध्या ते पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद निवडणुक २०२५ या प्रक्रीयेमध्ये नगराध्यक्ष पदाकरीता अर्ज भरला आहे. आज सकाळी ०८.३० वा.चे सुमारास ते झोपेत असताना घराच्या खालच्या मजल्यावर काही साधु लोकांचा बोलण्याचा आवाज आल्याने ते उठले. असता एक महिंद्रा टियुव्ही कार उभी होती. त्यामध्ये काही साधु बसलेले दिसले. त्यामधील २ साधु कांबळे घराच्या दिशेने जिन्यावरून येत असताना त्यांना दिसले.
त्यांच्या संपूर्ण अंगाला पांढरे भस्म लावलेले, अंगात भगव्या रंगाचा कुर्ता, भगव्या रंगाची लुंगी घातली होती. त्यांचे वय अंदाजे ३५ ते ४० दरम्यानचे असावे. त्यांना पाहुन कांबळे घराच्या बाहेर आले. त्यावेळी त्या दोन साधुंनी कांबळे यांना " महाराज गाडीत बसले आहेत, तुम्ही इलेक्शनला उभे आहात, महाराजांचा आशिर्वाद घ्या असे म्हणु लागला त्याच्या सोबतचा इसम हा हिंदीमध्ये बोलत होता. त्यावेळी त्या साधुने कांबळे यांच्या अंगावर अंगारा फेकण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे कांबळे आणि या साधूंच्यामध्ये झटापट व हातापायी झाली. या दरम्यान गाडीतुन तिसरा साधु उतरण्याचा प्रयत्न करीत होता यावेळी ते मला ओढून गाडी जवळ नेहण्याचा प्रयत्न करीत होते. या दंगामस्तीत गाडीची पाठीमागील काच फुटली. त्यानंतर ते साधु त्यांची गाडी घेवुन महाबळेश्वरच्या दिशेने पळून गेले आहेत. त्या गाडीचा क्रमांक युपी पासिंगचा असल्याचे कांबळे यांनी पाहिला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. साधुंच्या अशा प्रकारच्या गैरवर्तनामुळे कांबळे यांचे कुटूंबीय भयभीत झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
या घटनेचा अधिक तपास पाचगणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार व त्यांचे सहकारी करीत आहेत.
प्रतिक्रिया : याबाबत बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले सध्या निवडणूकीची धामधूम असल्याने काही लोक साधुच्या वेशात उमेदवारांना गंडा घालण्याचे प्रकार काही ठिकाणी घडत आहेत. नागरिकांनी अथवा उमेदवारांनी अशा साधूंपासून सावध रहावे. अशा प्रकारे कुठे फसवणूक होत असल्यास पाचगणी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस ठाण्याचे वतीने करण्यात आले आहे.


