NEWS & EVENTS

राजकीय

साताऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरु होणार

आमदार शिवेंद्रराजेंच्या पाठपुराव्याला मोठे यश

70shivendraje.jpg

सातारा : सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्याय अर्थात बहुचर्चित मडिकल कॉलेज सुरु होण्याचा प्रश्न आता सुटला आहे. मेडिकल कॉलेजची इमारत होईल तेव्हा होईल, तोपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या महिला रुग्णालय विभागाच्या इमारतीत मेडिकल कॉलेज सुरु करा, त्यासाठीची पदनिश्चिती आणि पदनिर्मीती तातडीने करा, अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आ. शिवेंद्रराजे यांनी एक महिन्यापुर्वी केलेल्या मागणीची पुर्तता नुकतीच झाली असून सातारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात म्हणजेच तीन वर्षांसाठी मडिकल कॉलेज सुरु करण्याचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकताच काढला आहे. अधिष्ठाता यासह प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आदी पदनिर्मीती आणि पदनिश्चितीही करण्यात आली असून येत्या काही महिन्यात साताऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार हे निश्चित.

सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. मात्र पाटबंधारे विभागाची जागा हस्तांतरण, इमारत बांधकाम यामुळे साता-यातील बहुचर्चीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भिजतं घोंगडं कायमच होते. इमारत कधी बांधणार आणि मेडीकल कॉलेज प्रत्यक्षात कधी सुरु होणार? याबाबत सांशकता निर्माण झाली होती. असे असताना आ. शिवेंद्रराजे यांनी अभ्यासपुर्ण मागणी करुन मेडीकल कॉलेज सुरु होण्याचा प्रश्न निकाली काढला आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्री कराड दौ-यावर आले असताना आ.शिवेंद्रराजे यांनी त्यांची आवर्जुन भेट घेवून मेडिकल कॉलेज सुरु करण्याबाबत लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. मेडिकल कॉलेजची इमारत होईल तेव्हा होईल, तोपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या महिला रुग्णालय विभागाच्या इमारतीत मेडिकल कॉलेज सुरु करता येवू शकते. ही जागाही शासनाचीच आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी निर्णय घेण्यात यावा आणि यासाठी आवश्यक पदनिर्मीती करुन पदे निश्चित करावीत. जेणेकरुन मेडिकल कॉलेजचे प्रथम आणि द्वितीय वर्ष अभ्यासक्रम सुरु होतील आणि जिल्ह्यातील होतकरु मुलांचा वैद्यकीय शिक्षण घेण्याचा मोठा अडसर दूर होईल. असे रास्त मुद्दे मांडून आ. शिवेंद्रराजे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत मेडिकल कॉलेज सुरु करण्याची आणि त्यासाठीची पदनिर्मीती आणि पदनिश्चिती करण्याची आग्रही मागणी ना. फडणवीस यांच्याकडे केली होती.

तसेच अधिवेशन काळातही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. आ.शिवेंद्रराजे यांच्या मागणीनुसार दि.१५ जुलै २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सातारा वैद्यकीय महाविद्यालय तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतीत सुरु करण्याचा अध्यादेश काढला आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या किमान निकषांनुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालाकरीता किमान ३०० रुग्णखाटांचे रुग्णालय आवश्यक सोईसुविधांसह उपलब्ध असणे गरजेचे असते. यास अनुसरुण सातारा येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेले जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात हस्तांतरीत करण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा रुग्णालयाच्या इमारतील बहुचर्चित मेडिकल कॉलेज सुरु होणार आहे. या निर्णयासह शासनाने अधिष्ठाता (डीन), प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, तज्ञ डॉक्टर्स आदी पदनिश्चिती आणि पदनिर्मीतीही केली असून याशिवाय इतर कर्मचारी म्हणून जिल्हा रुग्णालयातील स्टाफ तात्पुरता वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आ. शिवेंद्रराजे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून या निर्णयामुळे सातायात प्रत्यक्षात शासनाचे मेडिकल कॉलेज सुरु होणार आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी पुणे, मुंबई आदी शहरांवर अवलंबून राहणारया सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय थांबणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

कराड येथे प्रत्यक्ष भेट घेवून तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत मेडिकल कॉलेज सुरु करण्याची आणि त्यासाठी पदनिर्मीती करण्याची मागणी मी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देवून मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली आणि मेडिकल कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात प्रक्रीया सुरु झाली असून लवकरच प्रवेश प्रक्रीया, प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष अभ्यासक्रमही सुरु होईल. हे पहिले पाऊल असून मुख्यमत्र्यांनी सातारकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रीया आ. शिवेंद्रराजे यांनी यानिमीत्ताने दिली आहे.

डॉ.मुरलीधर तांबे होणार पहिले डिन

आ. शिवेंद्रराजे यांच्या मागणीनुसार शासनाने मेडिकल कॉलेज सुरु करण्यास मान्यता दिली असून त्यांच्या मागणीनुसार पदनिर्मीती आणि पदनिश्चितीही केली आहे. साताऱ्यात सुरु होणारया मेडिकल कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणजेच अधिष्ठाता(डिन) होण्याचा मान डॉ. मुरलीधर तांबे यांना मिळाला असून त्यांची यापदी नियुक्तीही करण्यात आली आहे. त्यांच्यासह प्राध्यापक, सहप्राध्यापक, तज्ञ डॉक्टर्स आदी पदांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.