सातारा, दि.२९- माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने गुगली टाकली आहे. भाजपकडून माढ्यात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र भाजपने मोहिते पाटील पिता पुत्रांऐवजी तिसऱ्याच उमेदवाराला तिकीट जाहीर केलं. माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माढ्यात आता भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात लढत होणार आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मोहिते पाटील पिता पुत्रांना तयार राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे विजयसिंह किंवा रणजितसिंह या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळणार हे जवळपास स्पष्ट होतं. पण आज अचानक सर्व अंदाज खोटे ठरवत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली.रणजितसिंह नाईक निंबाळकर हे चार दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. ते काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष होते. मात्र भाजपने त्यांना गळाला लावून थेट रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून रिंगणात उतरवलं आहे.
स्थानिक नगरसेवक, रणजित सिंह यांचे मोठे बंधू समशेर सिंह नाईक निंबाळकर आणि इतर नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कॅबिनेट मंत्री विनोद तावडे, मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची उपस्थिती होती.
राजकीय
माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना उमेदवारी जाहीर


