NEWS & EVENTS

राजकीय

सेना खासदारांचा प्रचार करण्यास भाजपचा नकार

पक्षावर केलेले आरोप मागे घेऊन जाहीर माफीची नगरसेवकांची मागणी

97pun02-4.jpg

पिंपरी, दि.26- पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ऐरणीवर आली आहे. शिवसेनेचे मावळचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव यांचा प्रचार करण्यास भाजप नगरसेवकांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. भाजपवर केलेले चुकीचे आरोप मागे घेऊन खासदारांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी या नगरसेवकांनी सोमवारी केली.

भाजपच्या पिंपरी पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्यासह भाजपचे ६५ नगरसेवक उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी युती धर्म पाळण्याचे आवाहन करून सर्व नगरसेवकांना बैठकीत आपापले म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले. तेव्हा दोन्हीही मतदारसंघाशी संबंधित नगरसेवकांनी खासदारांविषयीच्या तक्रारींचा पाढा वाचून दाखवला.

स्थानिक पातळीवर दोन्ही खासदारांनी कायम भाजपविरोधी राजकारण केले. भाजपवर आणि नगरसेवकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. शहरातील विकासकामांमध्ये खोडा घातला. खोटय़ा तक्रारी करून पत्रव्यवहार केले. चौकशांचे सत्र मागे लावले. मोदींवर टीका केली. मुख्यमंत्र्यांविरोधात काऊंटडाऊन आंदोलन केले. प्रस्तावित रिंगरोड बाधित नागरिकांना एकत्र करून भाजपच्या विरोधात आंदोलन घडवून आणले. पक्षनेते एकनाथ पवार यांना अतिशय वाईट वागणूक देण्यात आली. भाजपचे सरचिटणीस प्रमोद निसळ यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला, असे विविध मुद्दे नगरसेवकांनी बैठकीत मांडले.

खासदारांनी भाजपची माफी मागावी, यापूर्वी केलेले आरोप मागे घेतल्याची घोषणा पत्रकार परिषद घेऊन करावी. अन्यथा, शिवसेनेचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली. या बैठकीसंदर्भात काही नगरसेवकांकडे विचारणा केली असता, या माहितीस त्यांनी दुजोरा दिला. बैठकीतील माहिती बाहेर सांगण्यास सर्व नगरसेवकांना मज्जाव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, दोन्ही आमदारांनी याविषयी कोणतेही भाष्य केले नाही.