डहाणू : डहाणू तालुक्यातील जामशेत वसंतवाडी येथे बुलेट ट्रेन सर्वेक्षणाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याने मंगळवारी पोलीस बंदोबस्तात काही ठिकाणी सर्वक्षणाचे काम करण्यात आले. यावेळी तब्बल १००हून अधिक पोलीस,शीघ्रकृती दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.
दरम्यान ज्या शेतकऱ्यांची जमीन मोजणीस संमती दिली आहे. त्यांच्याच जमीनीचे सर्वेक्षण करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी कष्टकरी संघटना, माकप आणि आदिवासी एकता परिषदेने ठाम विरोध दर्शविला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बुलेट ट्रेनला जमीन देण्यास डहाणू, तलासरी, पालघर तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होत आहे. मंगळवारी बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणाला पोलीस बंदोबस्त वाढू लागताच जामशेत वसंतवाडी येथे सर्वेक्षणाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला. यावेळी कष्टकरी संघटनेच्या मधू धोडी, आदिवासी एकता परिषदेचे भरत वायडा, माकपच्या लहानी दौडा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी विरोध केला.मात्र तरी काही शेतकऱ्यांनी सर्वेक्षणाला संमती दिली आहे.
जामशेत येथे ८३ शेतकऱ्यांपैकी ७२ जणांनी सर्वेक्षणास संमती दिली आहे, असे एन.एच.एस.आर.सी.एलचे वरिष्ठ व्यवस्थापक एन. डी. वाघ यांनी सांगितले.
सौजन्य - लोकसत्ता ऑनलाईन
महाराष्ट्र
पोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण
बुलेट ट्रेनला जमीन देण्यास डहाणू, तलासरी, पालघर तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होत आहे.


