NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

शिवडे येथे एशियाड बस पलटी, आठ जण जखमी

97shivde.jpg

उंब्रज, दि. 19 (वार्ताहर) – पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिवडे, ता. कराड गावचे हद्दीत एका धाब्यानजीक सातारा ते कराड जाणार्‍या लेनवर मुंबई ते कराड जाणारी एशियाड बस चालकाने दुचाकीस्वारास वाचविण्याच्या नादात अचानक ब्रेक मारला. यावेळी चालकाचा बसवरील ताबा सुटून बस रस्त्याकडेला असणार्‍या नाल्यात पलटी झाली. या अपघातात बसमधील 8 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे, ता. कराड गावचे हद्दीत एका धाब्यानजीक सातारा ते कराड जाणार्‍या लेनवर मुंबई ते कराड जाणारी बस क्र. एम. एच. 20 बी. एल. 3625 या बसच्या समोर दुचाकीस्वार मोबाईलवर बोलत अचानक आडवा आला. यावेळी बसचालक सी. एस. गोसावी यांनी दुचाकीस्वारास वाचविण्यासाठी अचानक ब्रेक लावला. यावेळी चालकाचा बसवरील ताबा सुटून बस रस्त्याकडेला असणार्‍या नाल्यात जाऊन पलटी झाली. बसमध्ये एकूण पंधरा प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात बसमधील 7 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बसचालक चंद्रकांत शंकर गोसावी (वय 56), वाहक अशोक रामचंद्र यादव यांचेसह माधुरी विजय घोलप रा. गारगोटी, स्नेहल नंदकुमार पाटील रा. गडहिंग्लज, अस्मिता विकास कांबळे रा. घोगाव, सई विकास कांबळे रा. घोगाव, शैला संजय काकडे रा. कराड, हे प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. उंब्रज पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच हायवे हेल्पलाईनचे दस्तगीर आगा व सहकारी यांनी घटनास्थळी मदतकार्य केले. जखमींना उपचारासाठी कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.