NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

कासच्या स्वच्छतेसाठी सातारकरांना हाक

रविवारी विशेष स्वच्छता मोहिमेत सहभागाचे आवाहन

63ka-lake.jpg

सातारा, दि. 14– गेले दीड शतक साताऱ्याला शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या कास तलावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या रविवारी पर्यावरणप्रेमी सातारकरांच्या वतीने कास स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून सातारकरांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन ड्रोंगो पर्यावरणप्रेमी संस्थेचे अध्यक्ष सुधीर सुकाळे यांनी केले आहे.

गेली दीडशे वर्षे कास तलाव शुद्ध पाणी देऊन सातारकरांची तहान भागवतो. केवळ सातारकरच नव्हे तर आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांच्या आवडीचे एकमेव ठिकाण म्हणजे कास तलाव. त्याठिकाणी वनभोजनाचा आनंद लुटताना आपण नकळतपणे तेथेच कचरा टाकून येतो. तर काही महाभाग मुद्दामहून त्याठिकाणी कचरा करतात. पावसाळ्यात हाच कचरा पुन्हा पाण्यात जाऊन कासचे पाणी दूषित होणार आहे आणि हा सातारकरांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ आहे, याची जाणीव कोणीच ठेवत नाही. याबाबत जागृतीसाठी सातारकरांना ड्रोंगो साद घालत असल्याचे मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे यांनी सांगितले. येत्या रविवारी, दि. 17 मार्च रोजी सकाळी 7 ते 9 या वेळात लोकसहभागातून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. पर्यावरणप्रेमी नागरिक, मंडळे, भिशी ग्रुप, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघ आदी यामध्ये सहभागी होऊ शकतात.

प्रत्येकाने स्वत:ची वाहनव्यवस्था पहावी. सकाळी 7 पूर्वी कास बंगल्याजवळ पोहचण्याच्या बेताने साताऱ्यातून निघावे. सोबत पाण्याची बाटली, डोक्‍यावर टोपी, जेवणाचा डबा अथवा नाश्‍ता आणावा. नऊ वाजता स्वच्छता मोहीम संपेल. या मोहिमेत स्वच्छतेसाठी आवश्‍यक साहित्य ड्रोंगोच्या वतीने देण्यात येईल, असे सागर पारखे व सचिन तिरोडकर यांनी सांगितले. नागरिकांनी स्वेच्छेने या मोहिमेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी सुधीर सुकाळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कन्हैयालाल राजपुरोहित यांनी केले आहे.


https://www.youtube.com/embed/