NEWS & EVENTS

राजकीय

लोकसभेच्या जागांचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री घेणार उद्धव ठाकरेंची भेट

लोकसभेच्या जागांचा तिढा

57uddhav-fadnavis.jpg

भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी युती जाहीर केली. फक्त युतीच नाही तर लोकसभेचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर करण्यात आला. लोकसभेसाठी शिवसेना २३ तर भाजपा २५ जागा लढवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र यामधल्या काही जागांवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात चढाओढ दिसून येते आहे. याच संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

जालना येथील जागेचा वाद हा शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे. रावसाहेब दानवे हे सध्या जालन्याचे खासदार आहेत. मात्र शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना याच जागेवरून लढायचे आहे. दानवे आणि खोतकर या दोघांमध्ये असलेला छत्तीसचा आकडाही सर्वश्रुत आहेच. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला होता तेव्हापासूनच खोतकर यांनी दानवेंविरोधात दंड थोपटले होते. मात्र युती झाल्यावरही त्यांचा हाच तोरा कायम आहे. त्यामुळे जालन्याच्या जागेचा पेच कसा सोडवायचा याचे आव्हान दोन्ही पक्षांसमोर आहे. गुरुवारी होणाऱ्या बैठकीत या जागेवर मुख्यत्वे चर्चा होऊ शकते असाही अंदाज व्यक्त होतो आहे.

जालन्याच्या या डोकेदुखीसोबतच इतर जागांबाबतही शिवसेना आणि भाजपा यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. भिवंडीची जागा शिवसेनेला हवी असल्याचीही चर्चा आहे. सध्या या ठिकाणी कपिल पाटील हे भाजपाचे खासदार आहेत. त्यामुळे या जागेवर चर्चा होऊ शकते. भाजपा जालन्याच्या बदल्यात भिवंडीची जागा सोडणार का? यावरही गुरुवारी चर्चेची शक्यता आहे.


https://www.youtube.com/embed/