NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

धरणग्रस्तांनी उपाशी राहून केला आत्मक्‍लेश

36 व्या दिवशी आंदोलन सुरूच तीव्रता वाढणार

84koyana-dharan.jpg

सातारा, दि. 19 – आमचे चुकले तरी काय? असे आत्मचिंतन करत धरणग्रस्तांनी 36 व्या दिवशी उपाशी राहून आत्मक्‍लेश आंदोलन केले. धरणग्रस्तांच्या मागण्यांबाबत मागील 35 दिवसांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही हालचाल झाली नाही. परिणामी धरणग्रस्तांनी आत्मक्‍लेश करत आंदोलन तीव्र करण्याबाबत विचार-विनिमय केला.

कोयना धरणग्रस्तांचे पुर्नवसनासाठी आवश्‍यक रजिस्टर संकलनाची प्रक्रिया राबविण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने धरणग्रस्तांनी आत्मक्‍लेश करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न दाखविले गेले. म्हणून आम्ही आमचे घर-दार, शेतीवाडी, जन्मभूमी पाण्यात बुडविली. आमच्या त्यागातून देशाचा विकास आणि दुष्काळी जनतेला पाणी मिळणार असल्याच्या भावनेतून धरणग्रस्तांनी त्याग केला. मात्र, अद्याप धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया पुर्ण करण्यात येत नाही, असे डॉ.प्रशांत पन्हाळकर यांनी सांगितले.

एका बाजूला धरणग्रस्तांच्या जमीनी घेवून दुसऱ्या बाजूला दुष्काळी भागाला पाणी देण्याची योजना देखील करण्यात आली नाही. त्यामुळे मुख्य हेतूलाच धक्का बसलेला आहे. धरणग्रस्तांच्या अति पावसाच्या क्षेत्रातील जमिनी संपादित केल्या तर पुर्नवसनाची तरतूद अति कमी पावसाच्या भागात करण्यात आली आहे. असे असताना देखील अद्याप संकलन रजिस्टर करण्याच्या कामाच्या प्रश्‍नाची सोडवणूक होत नाही. त्यामुळे धरणग्रस्तांच्या मनात चीड निर्माण झाली आहे. गेल्या 36 दिवसांपासून आंदोलन करून सुध्दा काही ही हालचाल होत नाही. त्यामुळे आम्ही काय करावे, याबाबत विचार सुरू आहे. मात्र, आज आत्मक्‍लेष करत असलो तरी भविष्यात तीव्र आंदोलन कसे करायचे, याचा विचार सुरू आहे. तरी प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी डॉ.पन्हाळकर यांनी यावेळी केली.