NEWS & EVENTS

राजकीय

सत्ताधाऱ्यांना मतपेटीच्या माध्यमातून गाडा - उदयनराजे भोसले

69udaynraje-patan.jpg

पाटण, दि.२९- ईस्ट इंडिया कंपनीने आपल्यावर राज्य केले. तसेच सध्या केंद्रात सत्तेचे केंद्रीकरण झाले आहे. केंद्रीकरणाच्या माध्यमातून हुकूमशाही राबविली जात आहे. आणि या हुकूमशाहीच्या माध्यमातून पुन्हा इस्ट इंडिया कंपनीसारखी बिझनेस इंडिया कंपनी स्थापन करुन सर्वांना गुलामगिरीत ढकलण्याचे प्रयत्न आहेत. हे चित्र बदलण्यासाठी सत्ताधाऱ्यांना मतपेटीच्या माध्यमातून गाडा, असा घाणाघात श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज पाटणच्या सभेत केला.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ येथील स्पोर्ट आणि हेल्थ क्लब मध्ये झालेल्या बुथ कमिटीच्या मेळाव्यात ते बोलत होते.

माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला आमदार शशिकांत शिंदे, माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर, काँग्रेसचे नेते हिंदूराव पाटील, माहिती व तंत्रज्ञान सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, ‘‘देशाची अखंडता आज धोक्यात आली आहे. लोकशाहीचा विसर सत्तेवर आलेल्यांना पडला आहे. गेल्या पाच वर्षांत उद्योजक व्यापारी, शेतकरी, कष्टकऱ्यांना जास्ताजास्त गाळात घालण्याचे काम या सरकारने केले आहे. सरकारची ध्येयधोरणे अन्यायकारकरित्या राबविली. महात्मा गांधींनी पंचायत राजची संकल्पना मांडली. सत्तेच विकेंद्रीकरण करुन जोपर्यंत सर्वसामान्यांच्या हातात सत्ता देत नाही, तोपर्यंत या देशात लोकशाही नांदणार नाही. मात्र, लोकांनी प्रचंड बहुमत देऊनही या सरकारला जनतेचा विसर पडला. सत्तेचं विकेंद्रीकरण लांबच राहिलं. याठिकाणी सत्तेचं केंद्रीकरण झालं. आणि इथेच धोक्याची घंटा वाजली. लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही या देशात चालू झाली. नोटाबंदीमुळे देशाची दुरवस्था झाली. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली. याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘मी इश्यू बेस राजकारण केले. कधीही वैयक्तिक टिका केली नाही. मात्र, विरोधक म्हणतात माझी दहशत आहे. शिरवळ, खंडाळा, सातारा औद्योगिक वसाहतींमध्ये आम्ही अण्णासाहेब पाटील यांच्या विचाराने समाजकारण करतो. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना भरपाई म्हणून नोकरी द्याव्यात अशी मागणी केली तर त्याला दहशत म्हणतात. नोकऱ्यांत भूमिपूत्रांना प्राधान्य द्यावे, ऐवढीच मागणी आम्ही केली तर त्याला दहशत म्हणून टिका करतात. एखाद्या ठिकाणी अन्याय होत असताना मी गप्प बसणार नाही. आमच्या घराण्याची ती आम्हाला शिकवण नाही.’’

इस्ट इंडिया कंपनीने आपल्यावर राज्य केले. आत्ताच्या सरकारने सत्तेचे केंद्रीकरण केले. केंद्रीकरणाच्या माध्यमातून हुकूमशाही राबविली. आणि या हुकूमशाहीच्या माध्यमातून पुन्हा इस्ट इंडिया कंपनीसारखी बिझनेस इंडिया कंपनी स्थापन करुन सर्वांना गुलामगिरीत ढकलण्याचे प्रयत्न आहेत. शिवाजी महाराजांनी ब्रिटीशांना थारा दिला नाही. लोकांना एकत्र केले आणि जनतेच्या डोक्यातून येऊ घातलेली गुलामगिरी काढून टाकली.
देशाला पुन्हा गुलामगिरीत जाण्यापासून वाचवायचे आहे. स्वत:च्या कुटुंबाचा, तरुण पिढीचा, स्वत:च्या भागाचा व पर्यायाने देशाचा विचार करा. तुमचं मतपेटीतील मत जेवढे महत्वाचे आहे, तितकेच वैचारिक मतही महत्त्वाचे आहे. येणाऱ्या निवडणूकीकडे केवळ निवडणूक म्हणून न पाहता एक चळवळ म्हणून पहावे. ही चळवळ तुमच्या कुटुंबाच्या हिताची चळवळ झाली पाहिजे. यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचे सरकार निवडून देणे ही प्रत्येक नागरिकाची गरज आहे, असे आग्रही मत उदयनराजे यांनी मांडले.


केंद्र शासनाचे विविध निर्णय तसेच मन की बात, खात्यावर १५ लाख देण्याची घोषणा, २ कोटी युवकांसाठी रोजगार निर्मिती याची खिल्ली उडवत उदयनराजे भोसले म्हणाले, "उद्याच्या या निवडणुकांकडे एक चळवळ म्हणून पाहिलं पाहिजे. ५ वर्षांपुर्वी भुलथापांना बळी पडून लोकांनी केंद्रातील सरकार निवडले. ती चुक दुरुस्त करण्याची आज वेळ आली आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे उद्योग-व्यापारावर संक्रांत आली आहे. लहान व मध्यम व्यावसाईक, शेतकरी, नोकरदार, फेरीवाली, हातगाडीवाले सगळेच या सरकारच्या आर्थिक धोरणांचे बळी ठरले आहेत. या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी सध्याची व्यवस्था झुगारून देऊन या नाकर्त्या सरकारला आता लोक त्यांची 'मन कि बात ' जाहीरपणे बोलून दाखवायला लागले आहेत. आर्थिक धोरणांमुळे पिचलेली जनता येणा-या निवडणूकित या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही."

बस झाली आता तुमची मन की बात आता लोक स्वत:च्या मन की बात सांगतील. आणि केंद्रातील सरकारला घरी बसवतील, असा विश्वासही उदयनराजे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.

विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, "राज्यातील प्रशासकीय यंत्रणा युतीच्या काळात विस्कळीत झाली आहे. जनतेची आडवणूक केली जात आहे. त्याला संरक्षण देण्याचे काम लोकप्रतिनिधी करत आहेत. शासकीय तिजोरीत पैसा नाही. दीड वर्ष झाले कराड-चिपळून रस्त्याचे काम बंद आहे. इथल्या जनतेने कोणाकडे दाद मागायची."

"निवडणूक तंत्र बदलत आहे. निवडणुका जिंकायचे तंत्र म्ह्मनजे पोलिंग बुथ कमिटी आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. उदयनराजेंनी एकदा कमिटमेंट दिली तर ते स्वत:चंही ऐकत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील जनतेने निसंकोचपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील," असा विश्वास सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला.

यापुर्वी दोन वेळा तालुक्यातील जनतेने उदयनराजेंची पाठराखण केली आहे. आता तिस-यांदा त्यांना मताधिक्य देऊन हॅटट्रिक साधेल, असा शब्द हिंदूराव पाटील यांनी दिला. या वेळी शशिकांत शिंदे, समृद्धी जाधव यांची भाषणे झाली. सारंग पाटील यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने बुथ कमिटी सदस्यांना मार्गदर्शन केले. काँग्रेसचे नरेश देसाई, श्रीनिवास पाटील, डाॅ. शेखर घोरपडे, राजाभाऊ काळे, पांडूरंग यादव, सदाभाऊ जाधव, पाटणच्या नगराध्यक्षा सुषमाताई महाजन, दिपक शिंदे तसेच तालुक्याच्या विविध भागातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते.