NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

दरडी कोसळण्याच्या भितीने बोगद्यात वाहतुकीचा खोळंबा

36satara-tunnel.png



सातारा : प्रतिनिधी- दहा दिवसांपूर्वी सातारच्या 163 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक बोगद्यात दरड कोसळण्याची घटना घडली होती. त्यानंतर या ठिकाणी वारंवार मातीचा भराव व दगडी कोसळत राहिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली. त्यानंतर याठिकाणच्या धोकादायक दरडी हटवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली असून वारंवार कोंडी होत आहे.

सातारा शहराकडून परळीकडे जाणार्‍या भागात दरड कोसळली होती. त्यानंतरही या ठिकाणी माती आणि छोट्या दगडी कोसळण्याचे सत्र सुरू राहिल्याने वाहतूक धोकादायक झाली. त्यावर बोगदा येथील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागात जाऊन अधिकार्‍यांना माहिती दिली. त्यानुसार सार्वजिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एल. एन. वाघमोडे आणि उपअभियंता राहुल अहिरे यांनी पाहणी केली. त्यांनी बोगद्याच्या वरील असणारी झाडे आणि धोकादायक दरडी हटवण्याच्या सूचना कर्मचार्‍यांना दिल्या.

बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांनी याठिकाणची असलेली झाडे तोडून धोकादायक दरडी हटवण्याचे काम हाती घेतले आहे. हे कर्मचारी गेले 4 दिवस पहाटे 5 वाजल्यापासून ते सकाळी 9 पर्यंत या वेळेत हे काम करत असून दुपारी 12 ते 5 या वेळेत वाहतूक कमी प्रमाणात असेल त्यावेळी बोगद्यावरील माती आणि दगडी हटवण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे बॅरिकेटस लावून या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. वाहतूक विस्कळीत होऊ नये, कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून याठिकाणी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्यावतीने 4 होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे.

पर्यटनाला बसणार फटका.....

ऐतिहासिक बोगद्याच्या पडझडीचे सत्र गतवर्षीपासून सुरु आहे. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. त्यामुळे वारंवार दरडी कोसळत आहेत. आता दरडी कोसळल्याने गेल्या 10 दिवसांपासून बोगद्यातून एकेरी वाहतूक सुरु आहे. सध्या ठोसेघर धबधबा आणि कास पठार पाहण्यास पर्यटकांची गर्दी होत आहे. असे असतानाच हा बोगद्याची पडझड झाल्याने सातारहून ठोसेघरला जाणार्‍या पर्यटक आणि शेंद्रेमार्गे सातार्‍यात येणार्‍या पर्यटकांना याचा त्रास होणार आहे. त्यामुळे या पडझड आणि एकेरी वाहतुकीमुळे पर्यटनावर नक्कीच परिणाम होणार आहे.

पाणी झिरपण्याचे दुखणे कायम...

पावसाळा सुरु झाला की बोगद्यातून पाणी झिरपण्यास सुरुवात होते. त्यामुळे याठिकाणचा रस्त्याचीही दूरवस्था होते. मात्र, गतवर्षीपेक्षा यंदा मात्र, पाणी झिरपण्यात वाढ झाली आहे. संपूर्ण बोगदा ओलाचिंब होत असून त्यामुळे बोगद्याच्या अंतर्गत भाग कमकुवत होण्याची शक्यता आहे.तसे झाले तर कधीही मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

सौजन्य - पुढारी ऑनलाईन