सातारा , दि.7- सातारा शहरातील रविवार पेठ येथील शासकीय जमिनीसाठी 51 वर्षांपूर्वी माजी सैनिक जंगम यांनी पैसे भरले होते. परंतु, काल राज्य मंत्रिमंडळाने त्यांना सातारा शहरातील सदरबझार येथील जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने सैनिकांचा गौरव झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
याबाबत माहिती अशी की, रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील चंद्रशेखर मल्लिकार्जुन जंगम यांनी 25 ऑक्टोबर 1943 साली सेना दलात सेवा बजाविण्यासाठी सुरुवात केली होती. त्यावेळी 1965 च्या इंडो-पाक युद्धात त्यांना रक्षा मंडल पदक मिळाले होते. या कालावधीतच त्यांनी सातारा जिल्ह्यातील सातारा शहरात शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी 25 नोव्हेंबर 1964 रोजी रितसर अर्ज दाखल केला होता. सदरच्या अर्जाची पडताळणी करून तत्कालीन सातारा जिल्हाधिकारी यांनी सुभेदार चंद्रशेखर जंगम यांना सातारा शहरातील रविवार पेठ मधील 166/अ/1 ही शासकीय दराने जमीन खरेदी करण्याचा आदेश दिला.
त्यानुसार सुभेदार जंगम यांनी कर्ज काढून त्यावेळी जमिनीच्या कब्जे हक्कासाठी रोख तीन हजार सहाशे सतेचाळीस रुपये दि 20 सप्टेंबर1968 रोजी शासकीय तिजोरीत भरले होते.त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून ही सुभेदार जंगम यांना 1971 पर्यंत जमीन मिळाली नाही. ते सेना दलातून सेवानिवृत्त झाले होते. सदरची जागा इतरांच्या नावे हस्तांतरित केल्याचे त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना समजले. तेव्हापासून जंगम कुटूंबातील श्रीमती चंद्रभागा जंगम या जागेसाठी पाठपुरावा करीत होत्या. यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. शासकीय दरबारी व खासदार, आमदार यांनी सुध्दा दुर्लक्ष केले होते.सातारा जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंग गावात सैनिकांची संख्या जास्त आहे. त्याच जिल्ह्यात माजी सैनिकांना न्यायासाठी 51 वर्षे वाट पहावी लागली आहे.
अखेर सातारा जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त, पुणे आणि महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव यांना सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री जाधव यांनी 16 जून 2017 रोजी पत्र पाठवून त्यांचे म्हणणे मांडले होते. त्याची पावणे दोन वर्षाने शासकीय पातळीवर दखल घ्यावी लागली आहे. दि 5 मार्च रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रीमती चंद्रभागा जंगम यांना पर्यायी जागा म्हणून सातारा शहरातील सदरबझार येथील सिटी सर्व्हे नं. व 21 मधील 300 चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप-सेना युतीने 51 वर्षाने देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या नातेवाईकांचा खऱ्या अर्थाने गौरव केला आहे अशा शब्दात भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रमेश उबाळे, सुनील काळेकर व सेनेचे सातारा शहराध्यक्ष निमिश शहा, रमेश बोराटे यांनी भावना व्यक्त केली आहे.
सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांना शासनाने सुमारे 80 हेक्टर जमिनीचे वाटप केले होते. त्यापैकी अनेक धनदांडगे व राजकीय आश्रयाखाली असलेल्या नेत्यांनी अशा जमिनी बळकावले आहेत. सध्या पुलगाम घटनेनंतर अनेकांचे शहीद व माजी सैनिकांना बद्दल प्रेम उफाळून आले आहे. परंतु, अशा सैनिकांच्या जमिनी लाटणाऱ्यांना जाब केव्हा विचारणार?अशी प्रतिक्रिया उमटत आहे. आसू ता. फलटण येथे माजी सैनिक एकनाथ सपकाळ यांची जमीन अशाच प्रकारे लाटल्याचे प्रकरणी सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना माजी सैनिकाच्या विधवा पत्नीने दिले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप-सेना युतीचे कार्यकर्ते पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास अनेकांना वाटत आहे.
दैनिक प्रभातवरुन
सातारा जिल्हा
माजी सैनिकांच्या नातेवाईकांना 51 वर्षांनी मिळाली जमिन
साताऱ्यात शासकीय जमिनीसाठी 1968 मध्ये भरले होते पैसे


