NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

बँक ऑफ महाराष्ट्र शेणोली शाखेवर दरोडेखोरांचा गोळीबार

२२ लाखाची रोकड व १० तोळे सोन्याचा ऐवज लुटून दरोडेखोरांचे पलायन

22shanoli.jpg

कराड, दि. 11- कराड तालुक्यातील शेणोली येथे महाराष्ट्र बँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी गोळीबार करत २२ लाखाची रोकड व १० तोळे सोन्याचा ऐवज लुटून दरोडेखोरांनी पलायन केले. ही घटना सोमवार दि.११ रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी साताऱ्यासह सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी महाराष्ट्र बँकेच्या शेणोली शाखेचे कामकाज नियमित सुरू होते. दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास बँकेतील कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते. ते उपस्थित पाच ते सहा ग्राहकांना सेवा देत होते. अचानक दोन चारचाकी वाहनांमधून आलेल्या चौघांनी हातात पिस्तुल घेऊन बँकेत प्रवेश केला. पिस्तुलाचा धाक दाखवून तसेच भिंतीवर गोळीबार करत भीती दाखवली. दरोडेखोरांनी बँकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी व ग्राहकांना बँकेतील सेफ रूममध्ये कोंडून ठेवले. त्यानंतर दरोडेखोरांनी कॅश केबिन व स्ट्राँग रूम मधील सुमारे २२ लाख रुपयांची रोख रक्कम व दहा तोळे सोन्याचे दागिने पोत्यामध्ये भरून तेथून पोबारा केला. यावेळी दरोडेखोर कर्मचाऱ्यांचे व बँकेत आलेल्या लोकांचे ५ मोबईल घेऊन गेले. भर दुपारी बँकेवर पडलेल्या दरोड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्यासह पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली.


https://www.youtube.com/embed/