पाचगणी : पाचगणी येथे बेलीअर ते बेबीपॉईंट या शिवाजीनगरच्या वळणावर चेंबर मधून महिन्यापासून दूषित दुर्गंधीयुक्त गटारगंगा रस्त्यावर ओसंडून वाहत आहे.या दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत.
रस्त्यावर सतत साचणाऱ्या या दूषित पाण्यामुळे दुर्गंधी, चिखल आणि डासांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पाचगणीमध्ये गटारगंगा रस्त्यावर वाहने सामान्य झाले आहेत. ही ड्रेनेज समस्या अनेकदा निदर्शनास येत आहे. तक्रार करूनही समस्यांचे निराकरण कायमस्वरूपी होत नाही. तीच समस्या पुनःपुन्हा उद्भवते आहे. सदर ठिकाणी खाजगी मालकाच्या हद्दीतून ड्रेनेज लाईन च्या चेंबर मधून मैला आणी पाणी रस्त्यावर येत असून पाणी साचत आहे. त्यामुळे रस्ता ओला झाला आहे झाला असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दिवसभर वाहनांची गर्दी असलेल्या या मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबा होत असून परिसरात दुर्घधी पसरली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, या समस्येबाबत पालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी देऊनही कारवाई झालेली नाही. स्वच्छतेतील अव्वल प्रतिमा असणाऱ्या पर्यटनस्थळात अशी स्थिती असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुर आहे. पाचगणीसारख्या पर्यटनस्थळात अशी दुर्गंधीयुक्त परिस्थिती शहराच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारी असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.स्थानिक नागरिकांची मागणी आहे की, ड्रेनेज लाईनची तातडीने दुरुस्ती करून परिसराची स्वच्छता करण्यात यावी


