सुकमा, दि. 26- छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांसोबत मंगळवारी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले आहेत. तर काही नक्षलवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. दरम्यान, अद्यापही इथे शोध मोहिम सुरुच आहे.
राज्यातील पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील चिंतलनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत करकनगुडा गावाजवळील जंगलात पहाटे ६ वाजता ही चकमक सुरु झाली. सीआरपीएफच्या कोब्रा बाटालिअनची तुकडी इथे गस्तीवर असताना त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला. त्याला सुरक्षा रक्षकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले दरम्यान, चार नक्षलवादी ठार झाले.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी चकमक सुरु असताना काही नक्षलवादी तेथून पळून गेले. त्यानंतर घटनास्थळी शोध घेतल्यानंतर तिथे काळ्या गणवेशातील ४ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. तसेच त्यांच्याजवळून एक इन्सास रायफल, दोन ३०३ रायफल्स आणि इतर सामान जप्त करण्यात आले.
या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. सुरक्षा रक्षक ही मोहिम संपवून परतल्यानंतरच याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकेल. दरम्यान, या भागात नक्षलवाद्यांविरोधात अद्याप शोध मोहिम सुरुच आहे. छत्तीसगडमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी ११ एप्रिल, १८ एप्रिल, आणि २३ एप्रिल रोजी तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त बस्तरच्या जागेसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. या नक्षलग्रस्त भागात शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडावी यासाठी सुरक्षा रक्षक सातत्याने मोहिमेवर आहेत.
देश-विदेश
छत्तीसगड : सुरक्षा रक्षकांसोबत चकमकीत चार नक्षलवादी ठार


