NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

वाढत्या उन्हापासून बचावासाठी गारव्याचा शोध

चौका-चौकात दिसताहेत रसवंतीगृहांसह फळांचे स्टॉल

68gar.jpg

कराड, दि. 19 – मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या तीव्र झळा लागू लागल्याने अबालवृद्धांपासून सर्वांचीच पाऊले गारवा शोधण्याकडे वळू लागली आहे. लोकांची गरज ओळखून शहरातील चौका-चौकात विक्रेत्यांनी शीतपेये, रसवंतीगृहे व फळांचे स्टॉल लावलेले दिसत आहेत.

शहरातील बसस्थानक परिसर, दत्तचौक, कृष्णानाका, शाहूचौक, चावडीचौक या परिसरात लोकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे याच परिसरात रस्त्याच्याकडेला शीतपेये, विविध ज्युस सेंटर तसेच कलिंगड, द्राक्षे अशा फळविक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दुपारी बारा ते चार यावेळेत घराबाहेर पडणेही मुश्‍किल झाले आहे. उन्हाच्या तडाक्‍यामुळे घशाला कोरड पडत असल्याने नागरिकांना थंडगार ऊसाचा रस देण्यासाठी शहरात ऊसाच्या रसाची रसवंतीगृहे दाखल झाली आहेत.

ग्रामीण भागात गुऱ्हाळघरांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. मात्र शहरात गुऱ्हाळ घरे नसल्याने रस्त्या दुतर्फा असलेल्या ऊसाची रसवंतीगृहाकडे प्रवाशी व नागरिकांची पावले वळत आहेत. मात्र काही व्यापारीही नागरिकांचा फायदा घेताना दिसत आहेत. ज्यूसच्या एका ग्लासला मनाला वाटेल तसे पैसे घेतले जात आहेत. प्रत्येक चौकातील विक्रेत्यांचे दर काही वेगवेगळेच आहेत. यातून एकप्रकारे लूट करण्याचा प्रकार सुरु आहे.

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे चार महिने उन्हाळा ऋतूचे असतात. या चार महिन्यात सूर्याची उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते. सध्या तर मार्च महिन्यातच उष्णतेचा पारा चढलेला दिसून येत आहे. अशा या उष्म्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे म्हणजे आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे. उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी थंडगार शितपेयांना खूप मागणी असते. यामध्ये जास्त करुन नारळपाणी, लिंबू, आलेयुक्त ऊसाचा आयुर्वेदिक रस पिवून शरीराचे तापमान योग्य राखण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे रसवंतीगृहे सतत गर्दीने गजबजलेली दिसत आहेत.