NEWS & EVENTS

राजकीय

विक्रम पावसकरांना उमेदवारी द्या

भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत ठराव

56vikram-pavaskar.jpg

सातारा, दि. 8 –साताऱ्यात गुरुवारी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या गोपनीय बैठकीत जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी, असा ठराव एकमताने घेण्यात आला. तसेच तालुका कार्यकारिणीही याबाबत ठराव घेऊन प्रदेश कमिटीकडे पाठविणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

सातारा लोकसभा मतदार संघातील राजकीय चित्र दिवसेंदिवस बदलू लागले आहे. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळणार असल्याने कॉंग्रेस शांत आहे. पण राष्ट्रवादी अंतर्गतच खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांतच उमेदवारीवरून कलगीतुरा रंगला आहे. तीन दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी एक गुप्त बैठक घेतली होती. त्यामध्ये कार्यकर्त्यांनी उदयनराजेंनी राष्ट्रवादीत अवमानकारकरीत्या राहण्यापेक्षा भाजपमध्ये जाऊन लोकसभेची उमेदवारी घ्यावी, अशी आग्रही विनंती केली होती. तर या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या कार्यकत्यांनीही बैठक घेतली. त्यामध्ये राष्ट्रवादी जर उदयनराजेंना लोकसभेची उमेदवारी देणार असेल तर शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी आपली मते स्पष्ट केली होती.

या घडामोडी पाहता सातारा लोकसभेसाठी युतीतील शिवसेना, भाजप आणि “रिपाइं’ हे तीनही पक्ष इच्छुक आहेत. पण महायुतीत शेवटी कोणाकडे मतदारसंघ जाणार यावर पुढील घडामोडी अवलंबून असणार आहेत. सध्या मात्र, कॉंग्रेस सोडून इतरांच्याच बैठका सुरू आहेत. अशाच प्रकारे भाजपची साताऱ्यात बैठक झाली. येथील विश्रामगृहावर गुरुवारी भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, विजय साखरे, बबन कांबळे, विजय काटवटे, शहराध्यक्ष विकास गोसावी, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्‍वंभर बाबर, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. उज्ज्वलकुमार काळे, सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर खरात, विठ्ठल बलशेटवार, गणेश शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, तालुकाध्यक्ष उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत साताऱ्याची निवडणूक लढविण्याची व त्याची उमेदवारी विक्रम पावसकर यांना देण्याविषयी ठराव करण्यात आला. याला सर्वांनीच एकमताने पाठिंबा दिला. तर याचवेळी पदाधिकाजयांनी जिल्ह्यातील पक्ष वाढीची माहिती दिली.


https://www.youtube.com/embed/