NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील टंचाईचा आढावा

पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी झाल्यास 8 दिवसात टँकर सुरु करा

78DSC-4904-min.JPG

सातारा,दि.4 - ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी झाल्यास संबंधित ग्रामपंचायतीला 8 दिवसाच्या आत पाण्याचा टँकर सुरु झाला पाहिजे. यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी समन्वय साधून संवेदनशिलपणे काम करा, अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज केल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी टंचाईबाबत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्या त्या सोडविण्यास प्राधान्य द्या. जे प्रश्न सुटणार नाहीत ते प्रश्न जिल्हाधिकारी यांना जिल्हापातळीवर सोडवावेत.

पाणंद रस्ते योजनेत लोकसहभाग नोंदवा

जिल्ह्यात 77 पाणंद रस्त्यांना जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. या कामांचा कार्यादेश तात्काळ काढून प्रशासनाने हे 77 पाणंद रस्ते विशेष मोहिम राबवून येत्या 10 तारखेपर्यंत पूर्ण करावेत. या पाणंद रस्त्यांच्या कामांना नागरिकांनी प्रशासनाला सहकार्याबरोबर मोठा लोकसहभाग नोंदवावा. पाणंद रस्त्यांच्या पूर्ण झालेल्या कामांना मी स्वत: भेटी देईल, असे आश्वासनही पालकमंत्री विजय शिवतारे यांनी यावेळी दिले.

दुष्काळाचा निधी तात्काळ वाटप करा पालकमंत्र्यांच्या सूचना

खरीप हंगाम 2018 चे दुष्काळ अनुदान 4270.59080 लाख इतके प्राप्त झाले आहे. 3243.51320 लाख इतके अनुदान जिल्ह्यातील 116307 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले आहे. याची टक्केवारी 75.95 इतकी आहे. आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळ निधी जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ निधी वर्ग करण्याच्या सूचनाही पालकमंत्री विजय शिवतारे यांनी टंचाई आढावा बैठकीत दिल्या.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

सातारा जिल्ह्यात 9 लाख 78 हजार 570 शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. त्यापैकी आज अखेर 3 लाख 48 हजार 272 शेतकऱ्यांची यादी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अपलोड करण्यात आली आहे. ज्या पात्र शेतकऱ्यांनी आपली नावे योजनेसाठी दिली नसतील अशा शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्यातील यंत्रणेशी संपर्क साधून आपले नाव समाविष्ट करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी केले आहे.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही शासनाची महत्वकांक्षी योजना असून या योजनेंतर्गत 67 तलावातील गाळ काढण्याची तांत्रिक मंजुरी दिली आहे. या कामांचा कार्यादेश तात्काळ काढावा. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. योजनेच्या माध्यमातून तलावातील गाळ काढून तो शेतकऱ्यांनी आपल्या शेततात टाकल्यास शेतजमिनीची सुपीकता वाढणार असून कृषी उत्पन्नातही वाढ होणार आहे. तलावातील गाळ मोफत दिला जाणार असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री विजय शिवतारे यांनी यावेळी केले.

चारा छावण्याबाबत शासनाच्या निकषानुसार लवकर निर्णय घ्यावा. तसेच जिल्हाधिकारी यांनी सहकारी साखर कारखाने, को. ऑप बँकांशी व जिल्ह्यातील मोठ्या पतसंस्थाची बैठक घेऊन त्यांच्याकडून चारा छावण्या सुरु करण्याचे प्रस्ताव सादर करण्यासाठी लवकरात लवकर बैठक घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शेवटी केल्या.