नृसिंहवाडी, दि.१९- येथे मळीवाट मार्गावर शुक्लतीर्थ परिसरामध्ये गुरुचरित्रातील बावन्न अध्यायावर आधारित गुरुसृष्टी उभारली जाणार आहे. दत्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने लवकरच ही अभिनव संकल्पना साकारली जाणार आहे. येथे परिसरात हवा शुद्ध राहण्यासाठी व परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी आश्लेषा, मघासह २७ नक्षत्रांची बाग फुलणार आहे.
जे. जे. स्कूल मुंबईतील तज्ज्ञ व मार्गदर्शक यांनी शनिवारी पाहणी करून नियोजन आराखडा तयार करण्यास प्रारंभ केला आहे. एकूणच पर्यटन वाढून भाविकांच्या गुरुचरित्रातील प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहावा हा प्रकल्प मागील त्यांचा प्रमुख हेतू आहे.
कन्यागत महापर्वकाळाच्या पार्श्वभूमीवर शुक्लतीर्थामुळे नृसिंहवाडीसह परिसराला एकशे बावीस कोटी रुपये मंजूर झाले. त्या दत्त देवस्थान ट्रस्टअंतर्गत असणाऱ्या पाच एकर परिसराचा कायापालट करण्यासाठी दत्त देवस्थानचे अध्यक्ष रामकृष्ण पुजारी, सचिव अमोल विभूते, पुजारी परिश्रम घेत आहेत. एकूण जागेपैकी दोन ते तीन एकर शुक्लतीर्थ जागेत प्रथमतः काही पर्णकुटी यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.
नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी सांगितलेल्या गुरुचरित्रातील बावन्न अध्यायावर आधारित पर्णकुटीचा वापर करीत बावन्न मूर्ती त्यामध्ये कणेरीमठ व डेरवणच्या धर्तीवर अनेक मूर्ती प्रसंगानुरूप बसवण्यात येणार आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर चित्रफिती तयार करून ‘गुरुसृष्टी’ साकारली जाणार आहेत.
सत्तावीस नक्षत्र बागेची जिल्ह्यातील पहिली संकल्पना येथे साकारण्यात येणार आहे. तारा व दगडी कंपाऊंड सभोवतालाचा परिसर सुरक्षेसाठी बसवण्यात येणार आहे. या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी बाकडे, स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, निवास व्यवस्था केली जाणार आहे. एकूणच भाविकांच्या सेवेसाठी दत्त देवस्थान ट्रस्ट कटिबद्ध राहणार असल्याचे अध्यक्ष पुजारी व सचिव विभूते यांनी सांगितले.
कोल्हापूर
नृसिंहवाडीत साकारणार ‘गुरुसृष्टी’


