अहमदाबाद, दि. 19- पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाच्या अन्य नेत्यांनी ट्विटर हॅण्डलचे नाव बदलून त्यात चौकीदार समाविष्ट केले असतानाच आता गुजरातमधील काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपाला त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. हार्दिक पटेल यांनी ट्विटर हॅण्डलवर ‘बेरोजगार हार्दिक पटेल’ असा बदल करत भाजपाला चिमटा काढला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ‘चौकीदार चोर है’, या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘मैं चौकीदार हूँ’, अशी मोहीम जनमानसात राबविण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. पंतप्रधान मोदी यांचा समावेश असलेली एक व्हिडीओ ध्वनिचित्रफीत प्रसारित झाली आहे. समाजातील अनिष्ट बाबी व शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी मी सज्ज आहे, त्याकडे चौकस नजरेने चौकीदार म्हणून लक्ष ठेवून आहे, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला होता. यानंतर भाजपाच्या सर्व नेत्यांनी मी समाजहित जपण्यासाठी चौकीदार आहे, असे सांगत आपल्या ट्विटर हॅण्डलमध्ये चौकीदार असा बदल केला.
भाजपाची ही मोहीम सुरु असतानाच आता गुजरातमधील काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी देखील ट्विटर हँडलवरील नाव बदलले आहे. त्यांनी नावासमोर बेरोजगार असे म्हटले आहे. हार्दिक पटेल यांच्या या टीकेवर भाजपाकडून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या निवडणुकीत सत्तेवर येण्यापूर्वी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसने वारंवार मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
देश-विदेश
‘चौकीदार’ मोदींवर ‘बेरोजगार’ हार्दिक पटेलचा पलटवार
भाजपाची ही मोहीम सुरु असतानाच आता गुजरातमधील काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी देखील ट्विटर हँडलवरील नाव बदलले आहे.


