हिंगोली, दि.5- मराठवाडय़ातील हिंगोली, लातूर, जालना, बीड आदी जिल्ह्य़ात गुरुवारी सायंकाळी अचानक वादळ-वारे आणि गारांसह जोरदार पाऊस झाला. बीड जिल्ह्य़ात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. तर, हिंगोली शहराजवळील सावरखेड महामार्गावर एक बाभळीचे मोठे झाड रस्त्यावरच उन्मळून पडल्याने वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. औरंगाबादमध्येही सायंकाळी पावसाळी वातावरण निर्माण झाले होते.
बीडच्या केज तालुक्यातील तांबवा येथे शेतात काम करत असलेल्या तारामती बाळासाहेब चाटे (वय ४५) व धारूर तालुक्यातील धुनकवड येथील संदीपान श्रीकृष्ण काळे (वय २०) या तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. जिल्ह्य़ातील परळी वैजनाथ, केज, अंबाजोगाई, वडवणी, गेवराई आदी तालुक्यातही अवकाळी पाऊस झाला. पावसाने आंब्याचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. हिंगोली, कळमनुरी शहरासह जिल्ह्य़ातील इतरही तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कळमनुरी तालुक्यातील उमरखोजा गावात गारांसह पाऊस झाला. पावसामुळे आंबा, हळदीचे नुकसान झाले. हळद काढत असतानाच पाऊस आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सवना, कडोळी, आडगाव, शिरसम, गोरेगावसह जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त आहे. हिंगोली शहरात रात्रीपर्यंत पाऊस सुरू होता. लातूर जिल्ह्य़ातील उदगीर व निलंगा तालुक्यातील निटूर परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पावसासह काही ठिकाणी गाराही पडल्याचे वृत्त आहे. वारे फारसे नसल्याने पावसाने होणारे नुकसान टळले. जालना जिल्ह्य़ातील घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ, कुंभार पिंपळगाव आदी परिसरातही पाऊस झाला.
महाराष्ट्र
मराठवाडय़ात वादळी वाऱ्यासह पाऊस ; बीड जिल्ह्य़ात वीज पडून दोघांचा मृत्यू
कळमनुरी तालुक्यातील उमरखोजा गावात गारांसह पाऊस झाला. पावसामुळे आंबा, हळदीचे नुकसान झाले.


