मुंबई, दि.29- मी मुंबईकर असल्याचं मराठी असल्याचं कार्ड अजिबात खेळणार नाही. कोणतंच कार्ड खेळणार नाही, जे करणार ते मनापासून करणार असं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. तीन दिवसांपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने मुंबई उत्तर मतदारसंघातून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली आहे. आज त्यांनी मतदारसंघात एक भाषण केलं. त्यावेळी त्यांचा पेहराव, देहबोली या सगळ्यात बदल दिसून आला.
तुम्ही इंदिरा गांधींचा आदर्श ठेवला आहे, त्यांना फॉलो करत आहात का? असा प्रश्न उर्मिला यांना विचारण्यात आला. तेव्हा त्या म्हटल्या की इंदिरा गांधी यांच्यासारखे कपडे घालून काही होणार नाही. त्यांचे आचार विचार अवलंबले पाहिजेत, तेच महत्त्वाचं आहे. सध्या उकाडा वाढल्याने मी खादीची साडी परिधान केली आहे. मी कोणाचीही नक्कल करत नाही असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. धमक्यांबाबत विचारलं असता, त्या म्हणाल्या की होय मला अनेक फोन आले. ज्यामध्ये मला तुला बकरी बनवलं आहे, निवडणुकीला उभी राहशील तर याद राख या आणि अशा धमक्या देण्यात आल्या. पण मी कोणचंच नाव घेणार नाही कारण नाव घेतलं तर मीही त्यांच्यासारखंच राजकारण करते आहे असा संदेश जाईल. मला कुणाचंही प्रमाणपत्र नको, ज्याकडे मी मत मागायला जाणार त्यांच्याकडे मी प्रामाणिकपणे मत मागणार आहे.
बकबक करणे, पोपटपंची करणे ही भाजपाची स्टाईल आहे. माझी स्टाईल नेहमीच काम करण्याची आहे. मी काम करून दाखवणार आहे, तेच आश्वासन मी लोकांनाही देते आहे. माझ्या लग्नावरून आणि धर्मावरून वाद निर्माण करू पहात आहेत ते अत्यंत कोत्या मनोवृत्तीचे लोक आहेत. मी त्यांना महत्त्व देत नाही त्यांनी केलेल्य आरोपांना मी भीक घालत नाही. माझ्यासाठी माझं काम महत्त्वाचं आहे असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. मतदारसंघात लोकांशी संवाद साधल्यानंतर मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकर यांनी त्यांची सडेतोड मतं मांडली आहेत.
राजकीय
मी मुंबईकर असल्याचं, मराठी असल्याचं कार्ड खेळणार नाही-उर्मिला मातोंडकर
भाजपाचे नेते पोपटपंची आणि बकबक करण्यात पटाइत आहेत अशीही टीका उर्मिला मातोंडकर यांनी केली आहे


