अभिनेत्री कंगना रणौत हिनं ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात कंगना ही मुख्य भूमिकेत होती. जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला, मात्र या चित्रपटाला जर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही तर मात्र पुरस्कारांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिल असं मत कंगनानं मांडलं आहे.
वाढदिवशी माध्यमांशी संवाद साधताना कंगनाला राष्ट्रीय पुरस्काराविषयी विचारण्यात आलं जर माझ्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही तर या पुरस्काराच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिल असं ती म्हणाली. ‘गेल्यार्षी अंधाधूनमध्ये अभिनेत्री तब्बूनं चांगली भूमिका साकारली होती. आता जर मणिकर्णिकापेक्षा कोणी उत्तम कामगिरी साकारली असेल तर मी त्या कामाचं नक्की कौतुक करेन मात्र यापेक्षा सर्वोत्तम काम असूच शकत नाही’, असा आत्मविश्वास तिनं व्यक्त केला. यापूर्वी कंगनाला ‘क्वीन’, ‘फॅशन’, ‘तन्नू वेड्स मन्नू’ या तीन चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्यामुळे आता ‘मणिकर्णिका’ साठी देखील आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा असा विश्वास तिनं व्यक्त केला आहे.
‘मणिकर्णिका’च्या यशानंतर कंगाना ही सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री झाली आहे. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची लवकरच निर्मिती करण्यात येणार आहे. या बायोपिकमध्ये कंगना जयललिता यांची भूमिका साकारणार असून या चित्रपटासाठी तिने २४ कोटी एवढं सर्वाधिक मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या ती ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. कंगनासोबत राजकुमार राव या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ‘मेंटल है क्या’ सोबतच या वर्षांत तिचा ‘पंगा’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होत आहे.
Entertainment
‘मणिकर्णिका’ला राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्यास पुरस्काराची विश्वासार्हता धोक्यात : कंगना
'मणिकर्णिका'साठी कंगनाला हवाय राष्ट्रीय पुरस्कार


