नवी दिल्ली, दि. ११ - फ्रान्सबरोबर केलेल्या राफेल फायटर विमानांच्या खरेदी करारावरुन देशात जोरदार राजकारण रंगले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राफेलच्या खरेदीत घोटाळा केल्याचा विरोधकांचा आरोप आहे तर राफेलच्या विलंबाला विरोधक जबाबदार आहेत असा सत्ताधारी पक्षाचा आरोप आहे.
या विमानांवरुन कितीही राजकारण झाले तरी भविष्यात राफेल भारतीय हवाई दलाचे सर्वात प्रभावी अस्त्र ठरेल. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे. राफेलच्या समावेशामुळे पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय हवाई दलाची ताकत कैकपटीने वाढेल. बालकोटमधल्या एअर स्ट्राइकनंतर २७ फेब्रुवारीच्या सकाळी भारतीय हवाई हद्दीत पाकिस्तानी फायटर विमाने घुसली होती. त्या संघर्षात म्हणजे डॉगफाइटमध्ये आपण आपले एक मिग-२१ बायसन विमान गमावले.
राफेल ताफ्यात असताना अशी परिस्थिती उदभवली तर निश्चितच पाकिस्तानचे आता झाले त्यापेक्षाही जास्त नुकसान होईल. हवाई दलातील एका वैमानिकाने दिलेल्या माहितीनुसार २७ फेब्रुवारीच्या सकाळी भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी एफ-१६ फायटर विमानांनी अनेक अॅमराम क्षेपणास्त्रे डागली. पण त्यातल्या फक्त एकानेच लक्ष्याचा वेध घेतला. आपण सुद्धा त्यांचे एक एफ-१६ पाडले. तो सुद्धा एक चमत्कार आहे.
त्यांनी सुखोईच्या दिशेने अॅमराम क्षेपणास्त्रे डागली. पण ही सर्व क्षेपणास्त्रे वाया गेली. एकालाही लक्ष्याचा वेध घेता आला नाही. आपल्या वैमानिकाच्या कौशल्यामुळे त्यांचे क्षेपणास्त्र हल्ले निष्फळ ठरले. सुखोई हे भारतीय हवाई दलाचे अत्याधुनिक फायटर विमान आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास पाकिस्तानच्या एका एफ-१६ चा क्षेपणास्त्र हल्ला निष्फळ करण्यासाठी आपल्याला दोन सुखोई विमानांची गरज लागली.
त्याचवेळी आपल्याकडे मेटेओर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेले राफेल विमाने असती तर पाकिस्तानला एका राफेलचा सामना करण्यासाठी दोन एफ-१६ विमानांची गरज लागली असती. कारगिल युद्धाच्यावेळी ही स्थिती नव्हती. पाकिस्तानी एफ-१६ विमाने अॅमराम क्षेपणास्त्रांनी सुसज्ज नव्हती. त्यावेळी त्यांच्यापेक्षा आपल्याकडे चांगली क्षेपणास्त्रे होती. त्यांना २०११ साली अमेरिकेकडून अॅमराम क्षेपणास्त्रे मिळाली आणि वरचढ होण्याची संधी मिळाली असे हवाई दलातील एका वैमानिकाने सांगितले.
Featured Posts
…तेव्हा एक राफेल पाकिस्तानच्या दोन F-16 वर पडेल भारी
राफेल विमानांवरुन कितीही राजकारण झाले तरी भविष्यात राफेल भारतीय हवाई दलाचे सर्वात प्रभावी अस्त्र ठरेल


