NEWS & EVENTS

राजकीय

...तर मेढा आगाराला टाळे ठोकणार

आ. शिवेंद्रराजे : बंद बसेस पूर्ववत करण्याच्या सचना

94IMG-20190718-WA0017.jpg

मेढा : वार्ताहर- रस्ता खराब आहे, बस वळत नाही, बस बंद पडली तर स्थानिक ग्रामस्थ मदत करत नाहीत, ही कारणे आता बंद करा. आषाढी वारीही संपली आहे. त्यामुळे बसेस वारीला पाठवल्याचे कारण सांगू नका. येत्या चार दिवसात जावली तालुक्यातील बंद केलेल्या बसेस ग्रामस्थांनी सांगितलेल्या वेळेत सुरु करुन विद्यार्थी व जनतेची गैरसोय थांबवा. अन्यथा महामंडळाच्या मेढा आगाराला टाळे ठोकू, असा इशारा आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला.

जावली तालुक्यातील करहर, गोगवे, तेटली, बामणोली, वालुथ, कुडाळ, सायगाव, निझरे, सायघर, घोटेघर, मार्ली आदी गावांना जाणार्‍या बसेस मेढा आगाराने बंद केल्या. यासाठी थातूर मातूर कारणे मेढा डेपोच्या अधिकार्‍यांकडून दिली जात होती. हा सगळा प्रकार आ. शिवेंद्रराजे यांना समजला. त्यामुळे संतप्त होवून आ. शिवेंद्रराजे यांनी मेढा आगार गाठून आगारप्रमुख धनाजी घाटगे व अधिकार्‍यांना धारेवर धरले. आ. शिवेंद्रराजे आणि त्यांच्या समवेत आलेल्या पदाधिकार्‍यांचे आगत स्वागत करण्याचा प्रयत्न अधिकार्‍यांनी केला. यावर हे फुलं देणं बंद करा आणि एसटीचा विस्कळीत कारभार सुधारा, अशी ताकीद त्यांनी अधिकार्‍यांना दिली.

ज्या बसेस पुर्वीपासून चालू होत्या त्या तुम्ही काही ना काही कारणे सांगून बंद केल्या आहेत. जावली तालुक्यात सर्वत्र रस्त्यांची कामे झाली आहेत. ज्या ठिकाणी मोठी बस जाणार नाही त्याठिकाणी मिनीबस सुरु करा. आता वारी संपली आहे, त्यामुळे वारीला पाठवलेल्या बसेस ज्या त्या भागात पुर्ववत सुरु करा. तुम्ही लांब पल्ल्याच्या बसेस चालवण्यासाठी स्थानिक फेर्‍या बंद केल्याने त्या त्या भागातील विद्यार्थी आणि प्रवाशांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे सर्व बसेस येत्या चार दिवसात सुरु करण्यास त्यांनी अधिकार्‍यांना फर्मावले. येत्या चार दिवसात बस फेर्‍या पुर्ववत झाल्या नाहीत तर, मेढा डेपोला टाळे ठोकू, असा इशारा आ. शिवेंद्रराजे यांनी यावेळी दिला. यावर तातडीने बस फेर्‍या सुरु करु, असे आश्वासन उपस्थित अधिकार्‍यांनी दिले. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. जयश्री गिरी, ज्ञानदेव रांजणे, विजय सुतार, सौ. निर्मला दुधाणे, राजेंद्र सपकाळ, सागर धनवडे, गोरख महाडिक, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

सौजन्य - पुढारी ऑनलाईन