कोल्हापूर, दि. 6 - हिंदू नववर्ष म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानिमित्त जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ कोल्हापूर यांच्यावतीने ढोल ताशा पथकाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. सांस्कृतिक दर्शन तसेच सामाजिक संदेश यांचा मिलाफ या मिरवणुकीत पहायला मिळाल्याने या शोभायात्रेने कोल्हापूरकरांचे लक्ष वेधून घेतले. या शोभायात्रेत सामाजिक जाणिवांच्या जागृती होणारे, परंपरा आणि ऐतिहासिक चित्ररथ सहभागी झाले होते.
हिंदु संस्कृतीचे जतन व्हावे, सर्व लोकांनी एकत्र यावे, विविधतेतील एकतेचे दर्शन व्हावे, संत परंपरेचा वारसा जपला जावा, नवीन पिढीवर संस्कार व्हावेत यासाठी दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळाच्यावतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. शनिवारी गारगोटी मधून शोभायात्रा उत्साह आणि चैतन्यमयी वातावरणात काढण्यात आली. तत्पूर्वी काकडआरती करण्यात आली. शोभायात्रेचे उदघाटन कोल्हापूर जिल्हा आध्यात्मिक प्रमुख अजित पाटील, जिल्हा सेवाध्यक्ष रमेश लोकरे आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. शोभायात्रेची सुरुवात जोतिबा मंदिर, गारगोटी येथून झाली. शोभायात्रा महादेव मंदिर चौक, मुख्य बाजारपेठ, तहसिल कार्यालय चौक, डॉ. डी.वाय.पाटील प्रतिष्ठान कॉलेजचे मैदान, गारगोटी या मार्गावर येऊन शोभायात्रेची समाप्ती झाली.
शोभायात्रेच्या अग्रभागी ढोलताशा पथक, कलशधारी महिला, गुढीधारी महिला तर विविध चित्ररथांचा समावेश होता. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग, राम पंचायतन आणि सामाजिक जाणिवेबद्दल जागरुकता निर्माण करणा-या चित्ररथांचा समावेश होता. शोभायात्रेच्या माध्यमातून भक्त सेवा मंडळाच्या माध्यामातून केल्या जाणा-या सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर विविध फलकांचाही शोभायात्रेत समावेश होता. ही शोभा यात्रा पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती. शोभायात्रा यशस्वी होण्यासाठी जिल्हा सेवा भक्त मंडळाचे सर्व पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्र
जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळाच्यावतीने गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापूरात शोभायात्रा


