कोल्हापूर, दि.25 – जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचा प्रवचन आणि दर्शन सोहळा डॉ. डी.वाय.पाटील प्रतिष्ठान कॉलेजचे मैदान, गारगोटी ता.भुदरगड, जि.कोल्हापूर येथे भक्तीभावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाला. यावेळी भाविकांनी गुरुपूजन करण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. तर यावेळी काढलेल्या शोभायात्रेने कोल्हापूरकरांचे लक्ष वेधून घेतले.
गारगोटीमधील डॉ.डी.वाय.पाटील प्रतिष्ठान कॉलेजचे मैदान येथे जिल्हा भक्त सेवा मंडळाच्यावतीने प्रवचन आणि दर्शन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेची सुरुवात जोतिबा मंदिर, गारगोटी येथून झाली. शोभायात्रा महादेव मंदिर चौक, मुख्य बाजारपेठ, तहसिल कार्यालय चौक, डॉ. डी.वाय.पाटील प्रतिष्ठान कॉलेजचे मैदान, गारगोटी या मार्गाने कार्यक्रमस्थळी आली. यात्रेच्या अग्रभागी ढोल ताशा पथक होते. कलशधारी स्त्री, निशाणधारी पुरुष होते. बग्गीमध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. कलापथके आणि चित्ररथही सहभागी झाले होते. चित्ररथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, संताजी, धनाजी, बाजीप्रभू देशपांडे, राणी लक्ष्मीबाई वेशातील घोडयावर स्वार होऊन सहभागी झाले होते. या वैशिष्टयपूर्ण रॅलीने कोल्हापूरकरांचे लक्ष वेधून घेतले.
शोभायात्रा कार्यक्रमस्थळी आल्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे प्रवचन झाले. त्यात त्यांनी डोळे विज्ञानवादी, मन अध्यात्मवादी आणि बुध्दी वास्तववादी ठेवा. या त्रिसूत्रीने जीवनात सुख, शांती, समाधान, स्थैर्य, प्रगती साधता येईल. अंधश्रध्दा माणसाला अज्ञानाकडे घेऊन जातात. परंतु ज्या व्यक्ती वरील त्रिसूत्राचा वापर आपल्या जीवनात करतात अशा व्यक्ती जीवनाच्या वाटेवर चालत असताना हताश होताना दिसणार नाहीत. सुखात हुरळून जाणार नाहीत वा दुःखात कोलमडून पडणार नाहीत. सुखदुःखात खंबीरपणे जगण्याची उमेद साधनेमुळे येते असे सांगितले. त्यानंतर गुरुपूजन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात झाला. यावेळी शेकडो भाविकांनी साधक दीक्षा घेतली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा दर्शन आणि प्रवचन सोहळा यशस्वी होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा भक्त सेवा मंडळाने परिश्रम घेतले.
कोल्हापूर
हजारो भाविकांच्या उपस्थितीत जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचा प्रवचन आणि दर्शन सोहळा उत्साहात


