मेढा, दि. 5 (प्रतिनिधी) – मेढा-कुसुंबी, कोळघर-बामणोली-तेटलीमार्गे गोगवे या एसटीबसचा रविवारी शुभारंभ झाला. या एसटीसेवेमुळे कांदाटी खोऱ्यातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, ही एसटीसेवा सुरु होण्यासाठी सेना-भाजपसह राष्ट्रवादीनेही प्रयत्न केले होते. त्यामुळे आता दोन्ही पक्षातून बससेवेच्या शुभारंभ उद्घाटनाची चढाओढ सुरु झाली आहे.
जावळी तालुक्यातील अनेक गावे अतिदुर्गम आणि डोंगराळ असून त्यातील काही पूर्ववत जावळी हद्दीतील गावे रस्त्याविना महाबळेश्वर, सातारा या तालुक्यात विभागली गेली. परंतु कुसुंबी-कोळघर – बामणोली या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. या रस्त्यांवर खासगी वाहतूक सुरू असून आता महाराष्ट्राची प्राणवायू समजली जाणारी एस.टी. बससेवाही सुरू होत असल्याने बामणोली तेटली
तापोला, कांदाटी परिसरातल्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच रस्ता वातुकीसाठी सुसज्ज असून या एस.टी. बस सेवेमुळे तब्बल 60 ते 70 गावे मेढा बाजारपेठेला जोडली जाणार आहेत.तसेच अंधारी, मोळश्वर, म्हातेमुरा, पाटणेमाची, मांटी या दुर्गम भागातील विद्यार्थ्याचीही गैरसोय दूर होणार आहे.
मेढा बामणोली एसटी बस सुरू व्हावी यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. तर शिवसेना-भाजपकडून फ्लेक्सद्वारे ना. दिवाकर रावते यांचे धन्यवाद मानले. मेढा येथील वेण्णा चौकात झालेल्या या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे जावळी-सातारा विधानसभा क्षेत्रप्रमुख एस.एस. पार्टे गुरुजी, शिवसेना तालुकाप्रमुख विश्वनाथ धनावडे, सचिन करंजेकर, सचिन जवळ, विजय शेलार, मेढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा द्रौपदा मुकणे, संकेत पंडीत, बापू जवळ गीता लोखंडे, सुरेश जंगम तसेच शिवसेना भाजपाचे पदाधिकारी उपस्थिती होते.
तर कुसुंबी येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याहस्ते एसटी चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जावळी पंचायत समिती सभापती जयश्री गिरी, राजू सपकाळ, अर्चना रांजने, राजू सपकाळ व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थिती होते. एकाच एसटी बसचे दोनवेळा उद्घाटन झाल्यामुळे या कार्यक्रमाची दिवसभर चर्चा रंगली होती.
सातारा जिल्हा
मेढा-कोळघर-बामणोली एसटी सेवेचा शुभारंभ
एसटी शुभारंभ उद्घाटनाची शिवसेना-राष्ट्रवादीकडून चढाओढ


