NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

“गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’च्या पहिल्या कामाचा माणमध्ये शुभारंभ

जिल्ह्यात 18 लाख 75 हजार घनमीटर गाळ काढण्याचा मानस

87walu-696x392.jpg

दहिवडी, दि. 13 – “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अंतर्गत पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिल्या कामाचा शुभारंभ नवलेवाडी (ता. माण) येथे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच अनिल हराळे, अनुलोमचे वैभव हेगडे व दादा जगदाळे तसेच मलवडी, सत्रेवाडी व नवलेवाडी येथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. अनुलोम आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना यावर्षी मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात यावर्षी 18 लाख 75 हजार घनमीटर गाळ काढण्याचा “अनुलोम’चा मानस आहे.

या कामाची सुरुवात सत्रेवाडी गावातील नवलेवाडी येथील तलावातील गाळ काढण्याच्या कामाने करण्यात आली. यावेळी बोलताना प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे म्हणाले की शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणारी ही योजना आहे. या योजनेचा लाभ घेवून शेतकऱ्यांनी तलावातील गाळ मोठ्या प्रमाणात काढावा. ज्यामुळे मृतावस्थेकडे निघालेला तलाव जिवंत होईल. पाणीसाठा वाढल्याने सत्रेवाडी, नवलेवाडी, मलवडी, शिरवली या गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. शेती सुपीक होवून उत्पादनात चांगली वाढ होईल.

अनुलोमचे भाग जनसेवक दादासाहेब जगदाळे म्हणाले, यावर्षी गाळ काढण्यासाठी लागणारी मशीन अनुलोम देणार असून त्याच्या डिझेलचा खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे. वैशिष्ट्‌य म्हणजे गाळ काढण्याच्या कामाच्या ठिकाणी शासन डिझेल पोहचविणार आहे. त्यामुळे फक्त गाळ शेतात वाहून नेण्याचा खर्च शेतकऱ्याने करायचा आहे. सरपंच अनिल हराळे यांनी सर्व शेतकऱ्यांना गाळ नेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तसेच अनुलोम व महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.


https://www.youtube.com/embed/