माढा, दि.27- माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी दिल्यास आपण लढण्यास तयार असल्याचे वक्तव्य विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे. विजयसिंह यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजित निंबाळकर यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. पण अद्याप भाजपाला आपला उमेदवार जाहीर करता आलेला नाही. उमेदवारी कोणाला द्यावी यावरून मोठा खल सुरू आहे. दरम्यान, विजयसिंह मोहिते यांनी अद्याप राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे माध्यमांनी त्यांना भाजपाने तिकीट दिल्यास उभारणार का असा सवाल केला असता. त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. विजयसिंह मोहिते पाटील यांना भाजपाने तिकीट दिल्यास त्यांची राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्याशी लढत होईल. संजय शिंदे आणि मोहिते पाटील कुटुंबीयात राजकीय वैमनस्य आहे. त्यामुळे ही लढत रंजक ठरेल.
दुसरीकडे इतक्या दिवस भाजपाबरोबर असलेले जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी रणजितसिंह यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी प्रवेश करून उमेदवारीही मिळवली. त्यानंतर भाजपासमोर उमेदवार ठरवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे. अखेर माढा येथे माजी आमदार धनाजी साठे यांना भेटावयास आलेल्या विजयसिंहांनी पक्षाने संधी दिल्यास आपण निवडणुकीस उभारू अशी प्रतिक्रिया दिली.
राजकीय
भाजपाने संधी दिल्यास माढातून लढण्यास तयार: विजयसिंह मोहिते पाटील
संजय शिंदे आणि मोहिते पाटील कुटुंबीयात राजकीय वैमनस्य आहे. त्यामुळे ही लढत रंजक ठरेल.


