लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचाराची धूरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या खांद्यावरच आहे, असे दिसते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत मोदी- शाह हे दोघे देशभरात अनुक्रमे १२५ आणि १५० सभा घेणार आहेत. या दोघांच्या प्रचाराचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून देशभरात सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. उमेदवार जाहीर करणे, उमेदवारी अर्ज भरणे यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगबग सुरु असून सत्ता टिकवण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. यंदाच्या निवडणुकीतही भाजपाच्या प्रचाराची धूरा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरच असेल, असे दिसते. भाजपामधील सूत्रांनी हिंदूस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार मोदी २८ मार्च रोजी मेरठपासून प्रचाराला सुरुवात करतील. याच दिवशी ते जम्मूतही सभा घेतील. २९ मार्च आणि १ एप्रिलरोजी ओदिशा आणि ३० मार्च व ३ एप्रिल रोजी पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये ते प्रचारसभा घेणार आहेत. ३१ मार्च रोजी ते इटानगरमध्ये सभा घेतील आणि त्याच दिवशी ‘मै भी चौकीदार’ या मोहीमेअंतर्गत देशभरातील सुरक्षा रक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील.
दिल्ली, दि. 26- निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात नरेंद्र मोदी देशातील प्रत्येक राज्यात जातील, अशा पद्धतीने त्यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात येत आहे, असे सूत्रांनी सांगितले. तीन ते चार लोकसभा मतदारसंघासाठी एक अशापद्धतीने मोदींच्या प्रचारसभांचे घेतली जाणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये मोदी सर्वाधिक म्हणजेच २० प्रचारसभा घेतील, असे सूत्रांनी सांगितले. बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये १० प्रचारसभा घेतील, असे समजते. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ८०, पश्चिम बंगालमध्ये ४२ आणि बिहारमध्ये ४० मतदारसंघ आहेत. महाराष्ट्रात ४८ मतदारसंघ आहेत, पण राज्यात त्यांच्या किती प्रचारसभा होतील, हे अजूनही समजू शकलेले नाही.
राजकीय
मोदी- शाह भाजपाचे स्टार प्रचारक, जाणून घ्या देशभरात किती सभा घेणार
निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात नरेंद्र मोदी देशातील प्रत्येक राज्यात जातील, अशा पद्धतीने त्यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.


