NEWS & EVENTS

राजकीय

लोकसभा सत्तासंग्राम सुरू

महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान, मतमोजणी २३ मे रोजी

82election-2.jpg

नवी दिल्ली, दि. 10 निवडणुकीच्या तारखांविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना निवडणूक आयोगाने सात टप्प्यांत मतदान घेण्याचे रविवारी जाहीर केले. मतदानाचा पहिला टप्पा ११ एप्रिलला, तर शेवटचा टप्पा १९ मे रोजी पार पडेल आणि मतमोजणी २३ मे रोजी होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी जाहीर केले.

मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा यांनी विज्ञान भवन येथे भरगच्च पत्रकार परिषदेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्रात प्रथमच चार टप्प्यांत मतदान होणार आहे. आंध्र प्रदेश, अरुणाचल, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही लोकसभेबरोबरच घेण्यात येतील, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त करण्यात आली असली तरी तेथे सुरक्षिततेच्या कारणास्तोवर लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका होणार नाहीत. गेल्या वर्षी भाजप आणि पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी यांच्यातील युती तुटल्यानंतर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. निवडणुकीच्या घोषणेबरोबरच निवडणूक आचारसंहिताही आज, रविवारपासूनच लागू होत असल्याचे अरोरा यांनी जाहीर केले. आचारसंहिता लागू झाल्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना मतदारांवर प्रभाव टाकणारे धोरणात्मक निर्णय जाहीर करता येणार नाहीत.

मतदानासाठी १० लाख मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. २०१४च्या निवडणुकीसाठी नऊ लाख २७ हजार मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. या निवडणुकीत ९० कोटी मतदार आपला हक्क बजावतील. सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट म्हणजे व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेलचा वापर केला जाईल, असेही अरोरा यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीचा पहिला टप्पा ११ एप्रिल, दुसरा टप्पा १८ एप्रिल, तिसरा टप्पा २३ एप्रिल, चौथा टप्पा २९ एप्रिल, पाचवा टप्पा ६ मे, सहावा टप्पा १२ मे आणि सातवा टप्पा १९ मे रोजी होणार असून मतमोजणी २३ मे रोजी होईल, असे अरोरा यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात ९१, दुसऱ्या टप्प्यात ९७, तिसऱ्या टप्प्यात ११५, चौथ्या टप्प्यात ७१, पाचव्या टप्प्यात ५१, सहाव्या टप्प्यात ५९, तर सातव्या टप्प्यात ५९ मतदारसंघांत मतदान होईल.

राजकीय निरीक्षकांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आधीच प्रचार सुरू केला आहे. आता तो धारदार होत जाईल. गेल्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ५४३ पैकी ३३६ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला ४४ जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजपने स्वबळावर २८२ जागाजिंकल्या होत्या.

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेससह डावे पक्ष व इतर प्रादेशिक पक्ष मतविभागणी टाळण्यासाठी महाआघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजपने मित्रपक्षांबरोबर जागावाटपात आघाडी घेतली आहे. विरोधकांची अनेक राज्यांत अजून जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

२०१४ची लोकसभा निवडणूक

२०१४च्या निवडणुकीत एकूण नऊ लाख २७ हजार मतदान केंद्रे होती. ती निवडणूक ९ टप्प्यांत झाली होती. मतदानाचा पहिला टप्पा ७ एप्रिलला आणि शेवटचा टप्पा ९ मे रोजी झाला होता. मतमोजणी १६ मे रोजी झाली होती. त्या वेळी एकूण ८२५१ उमेदवार रिंगणात होते. म्हणजे प्रत्येक मतदारसंघात सरासरी १५ उमेदवार होते. त्या वेळी सात हजार उमेदवारांची अनामत जप्त झाली होती. त्या वेळी ५५ कोटींहून अधिक (६६.३ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ‘नोटा’साठी ६० लाख मतदान झाले होते. लोकसभेतील ५४३ खासदारांपैकी ६२ महिला होत्या. ६६८ महिलांनी निवडणूक लढवली होती.

वैशिष्टय़े

रात्री १० ते सकाळी ६ ध्वनिक्षेपक वापरावर बंदी
मतदान यंत्रावर (ईव्हीएम) उमेदवारांची छायाचित्रे, पक्षाचे चिन्ह
फोटो व्होटर स्लिप केवळ मतदान केंद्र शोधण्यासाठी
गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी अ‍ॅप. १७.४ लाख व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर

आचारसंहिता लागू

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आज, रविवारपासून लागू झाली आहे. त्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकारांना मतदारांवर प्रभाव पाडणारे धोरणात्मक निर्णय जाहीर करता येणार नाहीत.

चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक

आंध्र प्रदेश, अरुणाचल, ओडिशा आणि सिक्किम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही लोकसभेबरोबरच घेण्यात येतील; परंतु गेल्या वर्षी बरखास्त करण्यात आलेल्या जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक सुरक्षिततेच्या कारणास्तव लोकसभेबरोबर घेता येणार नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी भाजप आणि पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी यांच्यातील युती तुटल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.


https://www.youtube.com/embed/