सातारा, दि.१९- राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे, तर उमेदवारी कोणाला मिळणार, हे अद्याप स्पष्ट न झाल्यामुळे युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने प्रचारात आघाडी घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास आमदारांचा विरोध होता. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांच्या या म्हणण्याला तितकेसे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे उदयनराजे व आमदारांमधील वाद मिटावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.
सातारा दौऱ्यात केलेल्या विविध कृतीतून ते हे दाखवून देत होते. कोणत्याही परिस्थितीत हा वाद संपुष्टात आणायचा त्यांचा विचार होता. त्यामुळे त्यांनी उदयनराजेंना एक प्रकारे सिग्नल दिलेला होता.
त्यामुळे उदयनराजेंनी मतदारसंघामध्ये काम सुरू केले होते. मतदारसंघातील विविध तालुक्यांमध्ये कार्यक्रम व भेटी-गाठींच्या माध्यमातून त्यांनी लोकांशी संपर्क सुरू केला होता. त्यातच राष्ट्रवादीने चार दिवसांपूर्वीच आपली पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीमध्येच उदयनराजेंची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे उदयनराजेंच्या प्रचाराला आणखी जोर आलेला आहे. कऱ्हाड, पाटण येथील बैठकांबरोबरच नवी मुंबईमध्ये त्यांनी मेळावा घेतला. त्यामुळे उदयनराजेंच्या या संपर्क अभियानामुळे प्रचारात त्यांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही त्यामुळे उत्साह निर्माण होतो आहे. याउलट युतीची जिल्ह्यात स्थिती झाली आहे.
सातारा हा एकतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. त्यात उदयनराजेंसारखा तगडा उमेदवार देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत युतीला हा मतदारसंघ काबीज करायचा असल्यास प्रचारात आघाडी घेणे आवश्यक होते. परंतु, युतीमध्ये सातारा मतदारसंघ कोणाकडे राहणार, हेही अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. शिवसेनेचे पदाधिकारी मतदारसंघ आमचाच असल्याचा दावा करत आहेत तर, भाजपचे नरेंद्र पाटील हे मी उभा राहणारच, असा दावा करत आहेत. त्यातच भाजपमध्ये असलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी नुकतेच शिवबंधन बांधले. त्यामुळे मतदारसंघ शिवसेनेकडेच राहील, असे चित्र निर्माण झाले. परंतु, त्यानंतरही मतदारसंघासाठी युतीच्या नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याच्या चर्चा पुढे आल्या आहेत. त्यामुळे युती अद्याप मतदारसंघ कोणाचा, याच घोळात अडकलेली आहे. लढाईला प्रत्यक्ष सुरवात झाली असताना युतीला जिल्ह्यात सेनापतीच ठरलेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झालेला आहे.
भाजपची बूथपातळीवर मजबूत बांधणी
भाजपने जिल्ह्यात बूथपातळीवर केलेल्या कामांमुळे पक्षसंघटना जिल्ह्यात मजबूत होण्यास मदत झाली आहे. परंतु, उमेदवारी जाहीर करण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे युतीचा उमेदवार प्रचारात पिछाडीवर पडणार आहे. ती भरून काढण्यासाठी उमेदवाराबाबतचा युतीतील तिढा तातडीने सुटणे आवश्यक आहे.
राजकीय
सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची आघाडी, युतीत अद्याप संभ्रम


