NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

साता-याच्या माधुरी पवारने मिळवले झी युवा वाहिनीवरील 'अप्सरा आली' चे विजेतेपद

शुक्रवारी शाहूकलामंदिर येथे भव्य सत्कार

76madhauri-award.jpg

सातारा दि. ११- साता-याची सुकन्या माधुरी पवार हिने झी युवा वाहिनीवरील 'अप्सरा आली' या रिअॅलिटी शोचे विजेतेपद मिळवूण शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. लावणी समाज्ञा सुरेखा पुणेकर, सोनाली कुलकर्णी आणि दीपाली सय्यद अशा दिग्गज परीक्षकांसमोर एकसे एक बहारदार लावण्या सादर करून तिने आपल्या इतर स्पर्धाकांना मागे टाकले. आपल्या दिलखेचक अदांनी तिने संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगाच्या कानाकोप-यातील मराठी रसिकांना घायाळ केले. या सन्मानबद्दल सातारकरांच्यावतीने शुक्रवार दि. 15 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता शाहूकलामंदिर येथे सत्कार करण्यात येणार आहे.

झी युवा वाहिनीवरील 'अप्सरा आली' या रियालिटी शोच्या पहिल्या पर्वात प्रवेश मिळवून माधुरीने अर्धेअधिक यश मिळवले होते. एका अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या माधुरीच्या या शोमधील प्रवासाकडे सर्व जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. समोर दिग्गज परीक्षक आणि स्पर्धेत एकाहून एक लावण्या सादर करणा-या तुल्यबळ स्पर्धक असून ही माधुरी डगमगली नाही. या शोचा पहिला भाग ५ डिसेंबर २०१८ रोजी प्रसारीत झाला आणि माधुरी पवार हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. त्यानंतर माधुरीने मागे वळून न पाहाता यशाचा एक एक टप्पा पार केलो. पहिल्या शोमध्ये तिने 'मला हो म्हणतात लंवगी मिरची' ही लावणी सादर करुन तमाम रसिक आणि परीक्षकांची दाद मिळवली. तिचा हा पहिलाच परफॉर्मन्स ‘बंदा रुपया' ठरला. सुरेखा पुणेकर यांनी नजरेचा बाण तर दीपाली सय्यद यांनी मानाचा फेटा दिला. सोनाली कुलकर्णी यांनी मानाची नथ दिली. तिन्ही परीक्षकांकडून अशी वाहवा मिळाल्यामुळे माधुरीचा हुरूप वाढला. दुस-या भागात फडावरची लावणी सादर करायचे आव्हान होते. यामध्ये माधुरीने घ्याल का हो राया मला एक शालू बनारसी' ही लावणी सादर करून हा कार्यक्रम पहावा तर तो माधुरीसाठीच, अशी जबरदस्त दाद दिली. तिचा हा परफॉर्मन्सदेखील ‘बंदा रुपया' ठरला. तिस-या फेरीत लोककला व लोकनृत्य सादर करायचे होते. त्यात माधुरीने गोंधळ गीत सादर केले. या सादरीकरणात ती एवढी गुंग झाली होती की, स्टेजवर पडून तिचे नाक फ्रेंक्चर झाले. त्यातूनही सावरत तिने पुढच्या सर्व भागात आपल्या अदाकारीची कमाल दाखवत 'बंदा रुपया परफॉर्मन्स' अशी दाद मिळवली. पाचव्या भागातील परफॉर्मन्समुळे माधुरीने गेस्ट सेलिब्रिटी मानसी नाईक यांच्याकडूनही वाहवा मिळवली. मानसी नाईक यांनी माधुरी दीक्षितची उपमा दिल्याने माधुरीला आकाश ठेंगणे झाले होते. रसिकांच्या आशीर्वादामुळे माधुरीने पुढच्या भागांमध्ये गेला गर्दीत मारून धक्का धक्का’, ‘घागर घेऊन', या गीतांवर धमाकेदार परफॉर्मन्स केले. त्याचबरोबर जुगलबंदी राऊंडमध्ये टॉलीवूड स्टाईल, 'छत्तीस नखरेवाली' हे आयटम साँग, व्हॅलेंटाईन्स डे राऊंड यामध्येही माधुरीने आपल्या प्रतिस्पध्र्यांना मागे टाकले. हा शो सुरू असताना माधुरीला खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छापर संदेश मिळाला. त्यामुळे तिला आणखी बळ मिळाले. उपांत्य फेरीत ‘राजस्थानी कालबेलिया' या प्रकारात डोक्यावर घडे घेऊन खिळ्यांवर आणि काचांवर नाचून जबरदस्त परफॉर्मन्स दिला. त्यामुळे तिने टॉप फाईव्हमध्ये स्थान मिळवले.

आता होते महाअंतिम फेरीचे आव्हान आणि समोर होते, सचिन पिळगावकर यांच्यासारखे दिग्गज सेलिब्रिटी. या फेरीत माधुरीला 'साता-याची गुलछडी' ही लावणी सादर करायची संधी मिळाली. ही लावणी सादर करताना माधुरीच्या अदांवर सचिन पिळगावकर हेदेखील खूश झाले. त्यांनी या
परफॉर्मन्सची तारीफ करताना माधुरीच्या एनर्जी, एक्स्प्रेशन्स आणि परफॉर्मन्सचे वर्णन करताना शब्दही अपुरे पडत असल्याची भावना व्यक्त केली. त्यांनी माधुरीला मानाची ‘शंभराची नोट दिली तर दीपाली सय्यद यांनी पायातील चुंगरू दिले. त्यांनी स्वत: स्टेजवर येऊन हे चुंगरू तिच्या पायात घातले. या भन्नाट सादरीकरणामुळे माधुरीला विजेतेपद मिळेल, अशी अटकळ सर्वच रसिकांनी बांधली होती आणि ती अचूकही ठरली. परीक्षकांनी महाअंतिम फेरीचा निकाल जाहीर करताना प्रेक्षकांना विचारले, 'महाराष्ट्राची अप्सरा कोण आणि प्रेक्षकांमधून एकच आवाज आला ‘माधुरी पवार आणि त्यानंतर परीक्षकांनीही तिचे नाव जाहीर करताच एकच जल्लोष झाला. विजेतेपदानंतर महाराष्ट्राची अप्सरा' माधुरीने खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या वेळी सातारा पालिकेचे नियोजन समितीचे माजी सभापती डॉ. रविंद्र भारती, माजी नगरसेवक अशोक शेडगे हे उपस्थित होते. खा. उदयनराजे यांनी माधुरीचे अभिनंदन करुन पढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.


https://www.youtube.com/embed/