सातारा, दि. 18- आषाढी एकादशीनिमित्त विठूमाऊलीचा गजर करीत पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना पालखी सोहळ्याच्या मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा सहजतेने उपलब्ध करून देण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या चोख बजावत असतात. यामध्ये बारामती, सासवड (जि. पुणे), फलटण (जि. सातारा) विभाग तसेच सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या सुमारे 975 अभियंते व कर्मचाऱ्यांनी सुरळीत वीजपुरवठा व वीजसुरक्षेसह वीजविषयक सर्व सेवा अहोरात्र काम करून उपलब्ध दिल्या व खऱ्या अर्थाने 'प्रकाशयात्री' म्हणून कर्तव्य चोखपणे बजावले.
पालखी सोहळ्यामधील नियोजनात स्वतः सहभागी झालेले प्रभारी प्रादेशिक संचालक व बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे, अधीक्षक अभियंता श्री. चंद्रशेखर पाटील (बारामती मंडल), श्री. ज्ञानेश्वर पडळकर (सोलापूर मंडल) व श्री. उदय कुलकर्णी (प्रभारी - सातारा मंडल) यांच्यासह कार्यकारी अभियंता सर्वश्री गणेश लटपटे (बारामती), अरविंद वनमोरे (सासवड), सतीश राजदीप (फलटण), नंदकुमार सोनंदकर (प्रभारी - पंढरपूर) यांच्यासह 135 अभियंते व 840 कर्मचारी यंदाच्या पालखी सोहळ्यात वीजविषयक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत होते.
आषाढीनिमित्त संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व संत सोपानदेव महाराज पालखी सोहळा उत्साहात झाला. तसेच पंढरपूर येथे सुमारे 12 लाख भाविक आले होते. सुमारे 20 दिवसांमधील 95 टक्के सोहळा हा बारामती परिमंडलाच्या कार्यक्षेत्रात येतो. त्यामुळे पालखी सोहळा मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी वीजसेवा व वीजसुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे बारामती परिमंडलातील 'एक गाव एक दिवस' या उपक्रमाद्वारे पालखी मार्गावरील गावांमध्ये प्राधान्याने देखभाल व दुरुस्तीचे कामे करण्यात आले. पालखी सोहळा व पंढरपुरातील आषाढी यात्रेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेपासून सतर्क ठेवण्यासाठी जनमित्रांनी विशेष दक्षता घेतली. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच मागणीप्रमाणे तात्पुरती वीजजोडणी तात्काळ उपलब्ध करून दिली. त्यामुळे आषाढी महोत्सवात महावितरणची तत्पर वीजसेवा ही लाखो भाविकांसाठी समाधानाची ठरली. यासोबतच पालखी मार्ग व मुक्कामी जागोजागी फ्लेक्स उभारून तसेच वाहनरथ तयार करून वीजसुरक्षा व महावितरण मोबाईल ॲप, आॅनलाईन पेमेंटचा व इतर ग्राहकसेवेचा जागर करण्यात आला.
आषाढी पालखी सोहळ्याच्या मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी दोन महिन्यांपूर्वीच वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे कामे सुरु करण्यात आली होती. यामध्ये उच्चदाब व लघुदाब वाहिन्या, रोहित्राची देखभाल व दुरुस्तीची कामे तसेच डिस्क इन्सूलेटर बदलणे, झोल पडलेल्या तारा ओढणे, स्पेसर्स लावणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, गंजलेले, तुटलेले वीजखांब बदलणे, ऑईल फिल्टरेशन, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची कटाई, फ्यूज बदलणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीजतारा बदलणे, रोहित्रांना लोखंडी पत्र्यांचे सुरक्षा आवरण तसेच संरक्षक कुंपणाची देखभाल व दुरुस्ती, स्टेवायर व लोखंडी वीज खांबांना पीव्हीसी पाईप तसेच फिडर पीलरला पीव्हीसी कव्हर लावणे आदी कामांचा समावेश करण्यात आला. पालखी मार्ग व पालखी मुक्कामाच्या ठिकाणी महावितरणशी संबंधीत सर्व सेवांसाठी संबंधीत कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांच्यासह अभियंते व जनमित्रांचे नाव व मोबाईल क्रमांकाचे फलक लावण्यात आले तसेच वीजचोरी टाळण्यासाठी स्वीचबोर्डेद्वारे वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध झाली. त्यामुळे मोबाईल चार्जिंग किंवा इतर कामांसाठी वारकऱ्यांना जागेवरच वीजपुरवठा उपलब्ध झाला.
सातारा जिल्हा
पालखी सोहळ्यातील महावितरणचे 'प्रकाशयात्री'


