NEWS & EVENTS

सातारा जिल्हा

मलकापूर विषय समित्यांची धुरा काँग्रेसच्याच हातात

पाणी पुरवठा : मनोहर शिंदे, बांधकाम : राजेंद्र यादव, नियोजन : दत्ता पवार तर “महिला व बालकल्याण’ आनंदी शिंदे यांच्याकडे

61karad.jpg

कराड, दि.६ – मलकापूर नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडी मंगळवारी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. यावेळीही भाजपच्या नगरसेवकांनी सभापतीसाठी हालचाली करण्याचा प्रयत्न केला. मात्र संख्याबळाच्या जोरावर या निवडीतही विषय समितीच्या सभापतींची धुरा कॉंग्रेसच्याच हातात घेत कॉंग्रेसने बाजी मारली. विषय समिती निवडीनंतर कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाक्‍यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला.

मलकापूर नगरपरिषद निवडणूकीनंतर झालेल्या पहिल्याच विशेष सभेत उपनगराध्यक्षपदी मनोहर शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली होती. या निवडीनंतर विषय समित्यांवर कोणाकोणाची निवड होते. याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. मंगळवारी विषय समित्या निश्‍चित करण्याचा कार्यक्रम मुख्य प्रशासकीय इमारत सभागृहात विशेष सभेत पार पडला. यावेळी भाजपाच्या नगरसेवकांनी सभापतीपदासाठी नामनिर्देशन दाखल केले. मात्र, संख्याबळामुळे याठिकाणी कॉंग्रेसच्याच नगरसेवकांची सभापतीपदी वर्णी लागली. दुपारी 12 वाजता पिठासन अधिकारी यांनी विषय समित्यांचे सभापती व सदस्य निवडीची घोषणा केली.

यामध्ये पाणी पुरवठा स्वच्छता व जलनि:स्सारण समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम समिती सभापतीपदी राजेंद्र यादव, नियोजन, विकास व शिक्षण समिती सभापतीपदी दत्ता पवार तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. आनंदी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, विषय समिती निवडीत सदस्यपदी कॉंग्रेसच्या स्वीकृत नगरसेवकांना घेतले आहे. तसेच भाजपाच्याही नगरसेवक, नगरसेविका यांना चारही समित्यांवर सदस्य म्हणून सहभागी केले आहे.