कोल्हापूर, दि. 15 - ‘‘ देशाची लोकशाही पुन्हा टिकायची झाल्यास, संविधान टिकायचे असल्यास मोदी सरकारचा पर्दाफाश करण्याची हीच वेळ आहे. भाजप सरकारने किती खोटे बोलावे, याला परिसीमा राहिलेली नाही. ही निवडणूक काही नुसती धनंजय महाडिक यांच्यापुरतीच नसून हा देशपातळीवरचा विषय आहे. गेली साडेचार वर्षे भाजप सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. आपण किती मूर्ख आहोत, हे सिद्ध झाले आहे. दुनिया झुकती है; दुनिया झुकानेवाला चाहिये, असे मोदींना वाटते. त्यांचा पर्दाफाश करण्याची गरज आहे.’’, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी येथे केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचार नियोजनासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. महाडिक यांच्या संपर्क कार्यालय आवारात मेळावा झाला. खासदार महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, बी. एन. पाटील-मुगळीकर, भैया माने, युवराज पाटील, अनिल साळोखे आदी उपस्थित होते.
श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा तिढा येत्या दोन-चार दिवसांत सुटेल. खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेसाठी तीन जागांची मागणी केली आहे. हातकणंगलेची त्यांना दिलेली आहे; मात्र ते म्हणतात की मी निवडून आलेली जागा मलाच कशी देताय? त्यांच्या जागेसंदर्भात शरद पवार यांनी राहुल गांधींशी चर्चा केली आहे. हा तिढा लवकरच सुटून ते आघाडीत येतील. दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर यांचा हेतू काही चांगला दिसत नाही. त्यांनी जेवढ्या जागांची मागणी केली आहे, तेवढ्या देणे शक्य नाही. ’’
खासदार महाडिक म्हणाले, ‘‘या सरकारवर अनेक घटक नाराज आहेत. कोण कोणाबरोबर गठबंधन करतो, हेच समजायला तयार नाही. माझ्या हातून अनाहूतपणे काही चुका घडल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात मी सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. चुका पदरात घेऊन भविष्याची वाटचाल करूया. माझ्या परिवारातील प्रत्येक सदस्य प्रचारासाठी भेटीगाठींवर भर देत आहेत. आजपर्यंत ४० महिला मेळावे घेतलेले आहेत. काँग्रेसचे पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे यांची भेट घेतली आहे. काँग्रेसच्या अन्य नेत्यांना वरिष्ठ पातळीवरून कसा संदेश देता येईल, हेही महत्त्वाचे आहे.’’
के. पी. पाटील म्हणाले, ‘‘नाराजीची चर्चा आता कोणीही कुठेही करू नये. काँग्रेसचे नेतेही लवकरच प्रचारात सहभागी होतील. डावे पक्ष, जनता दल यांनाही आपल्या सोबत घ्यावे लागेल. लग्न राष्ट्रवादीचे असले तरी शेजारच्या गल्लीतील पाटील तांदूळ टाकायला आला म्हणून नाराज होऊ नका. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे. हसन मुश्रीफ फक्त कागल नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आहे.’’ यावेळी आमदार कुपेकर, माजी नगरसेवक आदिल फरास, अनिल साळोखे आदींनी मनोगत व्यक्त केले. ए. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले.
विचित्र परिस्थिती - मुश्रीफ
महाराष्ट्रात कोठेही नाही, अशी विचित्र परिस्थिती कोल्हापुरात आहे. भाजप शिवसेनेसोबत आहे. काँग्रेसचा अजून निर्णय झालेला नाही. त्यांची आणि आपली संयुक्त बैठक घ्यावी लागेल, असे मुश्रीफ यांनी सांगितले. दरम्यान, या मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आजची बैठक नियोजनाची होती. प्रत्येक मतदारसंघात गाव टू गाव प्रचाराची जबाबदारी निश्चित झाली. खासदार महाडिक यांनी काँग्रेस नेत्यांबाबत विधान करताना त्यांचे वरचे लोक, त्यांचे आमदार कसे सांभाळायचे, हे ते पाहतील, असे नमूद केले.
राजकीय
भाजप सरकारकडून लोकशाहीची हत्या- हसन मुश्रीफ


