मुंबई, दि.29- आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधत एक ट्विट केलं होतं. या ट्विटला मनसेनेही ट्विट करून उत्तर दिलं आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे असं ट्विट त्यांनी केलं. ज्यानंतर आता मनसेनेही आशिष शेलार यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
काय आहे मनसेचा ट्विट
मोदीमित्रांची चैन झाली भारतीयांच्या कष्टावर..
चेंडूफळीचा खेळ तुमचा, बारामतीच्या उष्ट्यावर
त्रिफळा उडवू मोदी शहांचा
गोलाकार खेळाडू तुमचे थकतील
काळजी नका करू शेलार भाऊ
बारावा गडी म्हणून तुम्हालाच साद घालतील
#हुकलेलं मंत्रिपद
असा ट्विट करत आशिष शेलार यांच्या ट्विटला मनसेने उत्तर दिलं आहे. कालच आशिष शेलार यांनी मनसेवर टीका करत एक खोचक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये त्यांनी कुठेही राज ठाकरेंचे नाव घेतले नव्हते. पण तो ट्विट राज ठाकरेंनाच उद्देशून होता.
काय होते आशिष शेलार यांचे ट्विट?
सोडून गेले.. सोडून गेले आमदार, एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही.. जाणत्या राजाला गाठले..पाठीवर हात ठेवून नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन.. बारामतीच्या काकांनी फक्त लढ असे म्हटले ”शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे”
हा ट्विट राज ठाकरे आणि मनसेला उद्देशून होता हे उघडच आहे. त्याला आता मनसेनेही तोडीस तोड उत्तर दिले आहे. आशिष शेलार यांना बारावा गडी म्हणत मोदी शहांचा त्रिफळा उडवू म्हणजेच लोकसभेत त्यांना हरवू असे मनसेच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
राजकीय
शेलार भाऊ तर बारावा गडी, टीकेला मनसेने दिले सडेतोड प्रत्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरही मनसेने टीका केली आहे


