NEWS & EVENTS

राजकीय

खासदार उदयनराजे आणि नाराज काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये दिलजमाई

77udyanraje.jpg

कराड, दि.२३- मलकापूरसह यापूर्वीच्या काही निवडणुकीमध्ये समर्थकांनी घेतलेल्या विरोधी भूमिकेमुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना यश आले. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिली.

कराड तालुक्यात मलकापूर नगरपालिका निवडणुकीसह जिल्हा नियोजन मंडळ तसेच अन्य निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या कराडमधील समर्थकांनी काँग्रेस विरोधात भूमिका घेतल्याने नाराज काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत काल, शुक्रवारी गृहीत न धरण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आज, शनिवारी दुपारी बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे जाणून घेत पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात चव्हाण यांना यश आले आहे. या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले हे सहभागी झाले. खासदार भोसले यांनी पाठीमागे झालेल्या चुका सुधारल्या जातील अशी ग्वाही दिली. तसेच आपण २४ तास उपलब्ध असून केव्हाही चूक लक्षात आणून दिली तरी आपली हरकत नसेल. मात्र पाठीमागील चुकांमुळे कोणीही मनात शंका बाळगू नये. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सुरू असलेल्या परिवर्तनाच्या चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी केले. भाजपासह केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी तसेच अन्य चुकीच्या धोरणांविरुद्ध टीका करत खासदार उदयनराजे भोसले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचा सन्मान राखू अशी ग्वाही यावेळी दिली.