NEWS & EVENTS

राजकीय

साडी, तिकीटानंतर आता टिकल्यांच्या पाकिटावर मोदींचा फोटो, सोशल मीडियावर ट्रोल

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळी शक्कल लढवली जात असून भाजपा त्यात आघाडीवर असल्याचं दिसत आहे

76Narendra-Modi-Bindi.jpg

नवी दिल्ली, दि.28- देशात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. सोशल मीडियापासून ते नाक्यापर्यंत सगळीकडे निवडणुकीची चर्चा आहे. 11 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. एकीकडे प्रचारसभांची सुरुवात झाली असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना बाजारातही निवडणुकीची धूम आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळी शक्कल लढवली जात असून भाजपा त्यात आघाडीवर असल्याचं दिसत आहे. साडी, टी-शर्टनंतर आता बाजारात नरेंद्र मोदींचा फोटो असणारं टिकल्यांचं पाकिटही आलं आहे. या पाकिटावर एकीकडे नरेंद्र मोदींचा फोटो आहे, तर दुसरीकडे भाजपाचं निवडणूक चिन्ह छापण्यात आलं आहे.

या पाकिटावर पारस फॅन्सी बिंदी लिहिण्यात आलं आहे. फोटोशॉप करुन नरेंद्र मोदींचा फोटो वापरला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अद्याप त्याची खात्री पटलेली नाही. मात्र हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत अनेकजण भाजपाची खिल्ली उडवत आहेत. तर दुसरीकडे समर्थक या फोटोवरुन विरोधकांवर निशाणा साधत आहेत.

फोटो शेअर करत अनेकजण मजेशीर कमेंट्स करत आहेत. काही समर्थकांनी काँग्रेसची खिल्ली उडवत मोदींचा फोटो पाहून तुम्ही टिकली लावायचं तर सोडणार नाही असा प्रश्न विचारत आहेत.

बाजारात याआधी नरेंद्र मोदींचा फोटो असणाऱ्या साड्या आल्या आहेत. अनेक ठिकाणी या साड्यांची विक्री होत आहे. सूरतमध्ये अशा साड्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. याशिवाय मोदींचा फोटो असणारे टी-शर्ट, कॉफी कप आणि टोपी बाजारात उपलब्ध आहेत. या सगळ्यानंतर आता टिकल्यांच्या पाकिटावर फोटो असल्याने युजर्स नरेंद्र मोदींना आणि भाजपाला ट्रोल करत आहेत.