मुंबई, दि.27- विकिपीडियावर शरद पवार यांच्या माहितीत आक्षेपार्ह बदल करून ती माहिती सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई आणि कराड पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
मंगळवारी एका अज्ञात व्यक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विकिपीडियाच्या प्रोफाईलसोबत छेडछाड केल्याचे समोर आले होते. देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा उल्लेख त्यांच्या प्रोफाईलवर करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर लगेच पुन्हा एकदा त्यामध्ये बदल करण्यात आला. पवार यांच्या प्रोफाईलशी छेडछाड झाल्याचे समोर येताच पुन्हा कोणीतरी त्यांचा उल्लेख देशातील सर्वात इमानदार नेता असा केला. आज मुंबई आणि कराडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे.
२४ तासांच्या आत शरद पवार यांच्या प्रोफाईल तीन वेळा बदलण्यात आली आहे. अपडेट प्रोफाईलमध्ये त्यांना भारतातील सर्वात प्रसिद्ध नेता असा उल्लेख विकिपीडियावर करण्यात आला आहे.
विकिपीडियावरील माहितीत कुणालाही बदल करता येतात त्यामुळे हा प्रकार घडला. याआधीही अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या बाबत हा प्रकार घडला होता. विकिपीडियावरील छेडछाड सध्या दुरूस्त करण्यात आली आहे. मात्र या प्रकाराची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.
राजकीय
विकिपीडियावर पवारांची बदनामी, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
पवारांविरोधातील आक्षेपार्ह माहिती सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार


