सातारा, दि. 15 - पूर्वीचे मतभेद विसरून पुढे गेले पाहिजे, अन्यथा आपण यशस्वी होणार नाही. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांना मीच निवडून आणणार आहे. मी माझा शब्द खाली पडू देणार नाही, असे आश्वासन राष्ट्रवादीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांनी दिले.
सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सातारा तालुका व शहरातील उदयनराजे समर्थकांच्या बैठकीत ते बोलत होते. बुधाजीराव मुळीक, भीमराव पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम, सुहास राजेशिर्के आदी उपस्थित होते. उदयनराजे म्हणाले, ‘‘प्रश्न जय-पराजयाचा नाही, तर तत्त्वाचा व या भागाच्या प्रगतीचा आहे. लोकशाहीत प्रत्येकाला उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार आहे. मला निवडून कशासाठी आणि का द्यायचे? सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे. माझ्यापेक्षा जास्त हित जोपासून प्रगती करू शकणारा उमेदवार असेल तर मी त्या व्यक्तीचा प्रचार करण्यास तयार आहे.’’
माझी दहशत आहे, असे सर्वजण बोलतात, पण का आणि कशासाठी, हे सांगताना उदयनराजे म्हणाले, ‘‘डिमांड रिस्पेक्ट व कमांड रिस्पेक्ट हे दोन्ही माझ्याकडे आहेत. मी कोणालाही दिलेला शब्द खाली पडू देत नाही. ‘एक बार मैंने कमिटमेंट कर दी, तो मैं खुदकीभी नहीं सुनता...’ आयुष्यात मी हेच कमविले आहे. तुम्ही सर्व जनता हीच माझी खरी संपत्ती आहे.’’ सध्याच्या सरकारने बनवलेल्या कायद्यांतून औद्योगिक क्षेत्रातील कारखाने बंद पडले, बेरोजगारी वाढली. शेतकऱ्यांची अवस्था पाहिली तर लाज वाटते.
निवडणुकीपेक्षा तुमची उन्नती होणे, हे महत्त्वाचे असून देश प्रगतिपथावर नेण्यासाठी अन्यायकारक कायदे बदलले पाहिजेत. त्यासाठी देशात सत्तांतर करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे स्पष्ट करत उदयनराजेंनी केंद्राच्या धोरणावर टीका केली.
राजकीय
राष्ट्रवादीचे आमदार मीच निवडून आणणार - खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले


